होमपेज › Sangli › क्षारपड जमिनीस लवकरच संजीवनी

क्षारपड जमिनीस लवकरच संजीवनी

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:30PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

क्षारपड जमीन सुधारणेसाठी केंद्र सरकारने नवीन योजना आणि भरघोस निधी मंजूर केल्याची माहिती आहे. ती योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास आणि मिळणारा पैसा सत्कारणी लागल्यास क्षारपड जमीनीला सुधारणेची संजीवनी मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मिरज पश्‍चिम भागातील हजारो एकर जमीन क्षारपड खाली आहे. मात्र आजपर्यंत  याबाबत फक्त आश्‍वासनाची खैरातच करण्यात आली आहे. प्रत्येक निवडणुकीत क्षारपड जमीन सुधारणेचे गाजर दाखवण्यात आले. मात्र  सगळा ‘बोलाचाच भात आणि बोलाची कढी ’  अशी स्थिती होती.

या भागात बारमाही वारणा नदी वाहते. पाण्याचा अतिरिक्त आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर यामुळे कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, समडोळी, तुंग, कसबे डिग्रज आदी गावांतील हजारो एकर जमीन क्षारपड झाली. पाच - सहा एकर जमीन असूनही  अनेक शेतकर्‍यांना दुसर्‍याच्या शेतात कामाला जाण्याची वेळ आली आहे. उपलब्ध माहितीनुसार कृषी विभागाकडून क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. संबंधित गावांमध्ये याबाबत माहिती गोळा करण्याच्या कामाला गती आली आहे.