Tue, Apr 23, 2019 13:52होमपेज › Sangli › तडसरच्या खिंडीत साळिंदरांची शिकार

तडसरच्या खिंडीत साळिंदरांची शिकार

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 11:03PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव  तालुक्यातील तडसर येथे  खिंडीत वनक्षेत्रात शुक्रवारी  दुपारी दोन साळिंदरांची शिकार करताना दोघांना पकडण्यात आले.  संशयित  सागर जगन्‍नाथ जाधव (वय 19) व विजय  बाळू जाधव (18, दोघे रा. तडसर)  यांना वन विभागाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मृत साळिंदर, लोखंडी जाळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तडसर येथे शिरसगाव रस्त्यालगतच्या खिंडीत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात कोणी तरी शिकार करीत असल्याचा संशय वनाधिकार्‍यांना आला होता.

शुक्रवारी  दुपारी  कडेगावचे वनपाल ए. पी. सवाखंडे व वांगीतील वनरक्षक जितेंद्र खराडे  कडेगाव- सोनसळ या मार्गावर  गस्त घालत  होते. यावेळी त्यांना तडसर येथील खिंडीत तलावासमोर  सागर जाधव व विजय जाधव हे दोघेजण मोटारसायकल (एम.एच.10 सी. एल. 2529) वरून पोत्यामध्ये काहीतरी भरून घेऊन जात असताना दिसले.वनाधिकार्‍यांनी त्यांना अडविले व पोत्यात काय भरले आहे ते दाखविण्यास सांगितले. यावेळी पोत्यांत दोन मृत साळिंदर आढळली. त्यांना  साळिंदरांची  शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने ताब्यात घेतले. लोखंडी जाळीच्या सहायाने ही शिकार करण्यात  आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

साळिंदराबाबत लोकांत गैरसमज 

साळिंदर ऊर्फ साळू हा कुरतडणारा प्राणी आहे. मोठ्या घुशीसारख्या दिसणार्‍या या प्राण्याच्या अंगावर काटे असतात. हे काटे म्हणजे त्याच्या पाठीवरचे केस असतात. अंगावर छोटे जाड काटे असतात. शेपटीवरचे काटे पोकळ असतात. त्यामुळे त्याने शेपटी हलवली की ते काटे खुळखुळ असा आवाज करतात. शत्रूपासून बचाव करण्यासाठी हा प्राणी अंगावरचे काटे फेकतो. तसेच  काटे एकदम ़फुलवून वेगाने उलटे धावतो. या प्राण्यांच्या काट्यांचे चूर्ण करून ते खाल्ल्याने हाडांना बळकटी येते, असा एक गैरसमज आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या डोंगराळ भागात हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. तो बिळात राहतो.