Sun, Mar 24, 2019 08:46होमपेज › Sangli ›  वाळवा तालुक्यात अवैध दारू विक्रीला ऊत

 वाळवा तालुक्यात अवैध दारू विक्रीला ऊत

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 10:49PM

बुकमार्क करा

वाळवा : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्गावर दारू विक्रीला बंदी आहे. त्यामुळे या भागातील देशी-विदेशी दारूची दुकाने बंद झाली. मात्र गल्लीबोळामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू झाली आहे.त्यामुळे सामाजिक शांतता आणि सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे  गावागावांमधून दारू विक्री केली जात आहे. अनेकांना तर या नव्या व्यवसायामुळे मोठा ‘रोजगार’ उपलब्ध झाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामीण भागातील देशी दारू, विदेशी दारू, बिअर शॉपी चार महिन्यांपासून बंद आहेत. नेमका याचा गैरफायदा घेऊन तालुक्यात गावागावात जिल्ह्याच्या ठिकाणाहून मिळेल त्या किंमतीला दारूच्या बाटल्या विकत घेऊन गावात आणून विकल्या जात आहेत. वैशिष्ट्य म्हणजे 40 रुपयाची क्वॉर्टर 70 ते 80 तर विदेशी 140 रुपयांची  200 ते 210 रुपयांना राजरोसपणे विक्री केली जात आहे. ग्रामीण भागातील मद्यपी  मिळेल त्या किंमतीला दारू खरेदी करीत आहेत. 

ग्रामीण भागामध्ये एखादे-दुसरे देशी-विदेशी दारूचे दुकान होते. मात्र आता काही  मंडळी या व्यवसायात प्रचंड पैसा मिळू लागल्यामुळे सक्रीय झाली आहेत.  सायकल चालविणार्‍यांनी मोटारसायकल घेतल्या. तर मोटारसायकलवाल्यांनी चारचाकी गाड्या घेतल्या. त्यामुळे या व्यवसायाकडे तरुणांचा ओढा वाढू लागला आहे. अनेक गावांत पोलिसांनी छापे घातले. त्याचा परिणाम अजिबात झालेला नाही. बर्‍याच गावांत पोलिस छापे टाकून गेले की काही वेळात पुन्हा त्या-त्या ठिकाणी दारू विक्री सुरू असते.त्यामुळे पोलिसांचा आणि विक्रेत्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला आहे. ग्रामस्थांत आश्‍चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता फिरते विक्रेते तयार झाले आहेत. मद्यपि लोकांना ते माहीत असतात. त्यामुळे या फिरत्या विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहे.

हरांमध्ये  ऑन मनी घेऊन बॉक्सने दारूविक्री केली जाते. नेमका याचा फायदा ग्रामीण विक्रेत्यांना मिळू लागला आहे. तालुक्यामध्ये  उत्पादन शुल्क विभागाकडून  ठोस कारवाई होत नाही. त्यांच्याकडे मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे ते अपवाद वगळता  कोणतीही कारवाई करीत नाहीत. परिणामी त्यांचा या अवैध मद्य विक्रेत्यांवर अजिबात धाक उरलेला नाही.