Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Sangli › सागरेश्‍वर अभयारण्याकडे विदेशी पक्ष्यांनी फिरवली पाठ

सागरेश्‍वर अभयारण्याकडे विदेशी पक्ष्यांनी फिरवली पाठ

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:49PMदेवराष्ट्रे : वार्ताहर 

भारतातील पहिल्या  मानवनिर्मित अभयारण्यात मागील काही वर्षांपासून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत होते. अभयारण्यात मध्य युरोप आणि हिमालयाच्या पर्वतरांगांतून मोठ्या प्रमाणात विविध जातीचे पक्षी पाहावयास मिळाले होते. यामध्ये विदेशी 11 प्रजातींचा समावेश आढळून आला होता. हे पक्षी एप्रिल मध्यापर्यंत अभयारण्य परिसरात पहावयास मिळत होेते. मात्र  यावर्षी जणू ‘सागरेश्‍वर’ वर विदेशी पक्षी रुसले असून अभयारण्याकडे विदेशी पक्ष्यांनी  पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. सागरेश्‍वर अभयारण्य हे हरिणांच्या  विविध जातींसाठी प्रसिध्द आहे.  येथे चितळ, सांबर, काळवीट मोठ्या संख्येने पहावयास मिळतात. सागरेश्‍वर अभयारण्याची निर्मिती मुळातच पर्यावरण  संवर्धनाचा  ध्यास घेऊन 1972 च्या दुष्काळात वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी केली.

तत्कालीन  वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सागरेश्‍वर अभयारण्यातील विकास कामे  मार्गी लावली. माहिती केंद्र, बांबू लॉगट, अ‍ॅम्पी थिएटर, विविध खेळण्यांनी परिपूर्ण बालोद्यान, विश्रामगृह, पर्यटकांसाठी प्रतीक्षा केंद्र, युवा गृह आदी कामे  मार्गी लावण्यात आली आहेत.  या अभयारण्यातील लिंगेश्‍वर परिसर, वणू विहार तलाव, कुंभारगाव तलाव, देव तलाव, मृग विहार यासह अभयारण्याच्या विस्तारीत क्षेत्रात  देशी-विदेशी पक्षी पहावयास मिळत होते. सन 2015 मध्ये वनविभागाने पक्षी तज्ञांच्या मदतीने पक्ष्यांचा सर्व्हे केला होता. यामध्ये 11 विदेशी जातीचे पक्षी आढळून आले होते. हिमालयातूनही मोठ्या प्रमाणात पक्षी येत होते. मात्र आता या चित्रात  बदल होऊ लागला आहे.