Sat, Jun 06, 2020 07:05होमपेज › Sangli › सागरेश्‍वर अभयारण्याला भीषण आग

सागरेश्‍वर अभयारण्याला भीषण आग

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:28PM

बुकमार्क करा
देवराष्ट्रे : वार्ताहर

सागरेश्‍वर अभयारण्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. दुपारचे ऊन आणि जोरदार वारा यामुळे  आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत झाडेझुडपे आणि गवत याच्यासह सरपटणारे प्राणी व दुर्मीळ वनौषधी जळून खाक झाल्या. अभयारण्यातील 200 ते 300 एकर क्षेत्र जळाल्याचा अंदाज आहे. आग शॉर्टसर्किटने लागल्याची प्राथमिक  शक्यता आहे. परिसरातील युवक व क्रांती कारखान्याच्या अग्‍निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. आग विझवताना एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

अभयारण्याच्या तुपारी-ताकारी गावांकडील हद्दीमध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग   लागल्याचे दिसून आले. जोरदार वारा आणि वाळलेले गवत यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. तुपारी-ताकारीकडील बाजूंकडून देवराष्ट्रेकडील बाजूकडे जोरदार वेगाने आग पसरत गेली. कर्मचार्‍यांनी स्थानिक युवकांना मदतीला घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. क्रांती कारखान्याच्या अग्‍निशमन बंबाने  थेट किर्लोस्कर पॉईंटवरून पाण्याचा फवारा केला. त्यामुळे आग आटोक्यात आली.   सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आगीच्या धुराचे लोट दिसत होते. या आगीमध्ये हरणांसाठीचा आवश्यक चारा जळून खाक झाला आहे. याशिवाय दुर्मीळ वनौषधी, सरपटणारे प्राणी नष्ट झाल्याची भीती  आहे.             

मात्र सुदैवाने कोणत्याही हरणाला दुखापत झाल्याचे दिसून आलेले नाही. ताकारी हद्दीमध्ये असलेल्या विजेच्या खांबावरून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज सागरेश्‍वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी व्यक्त केला.आग विझवताना वन्यजीव विभागाच्या वनरक्षक शिवकन्या नरळे यांच्या हाताला भाजले आहे.    

फायर अलर्ट यंत्रणा निष्क्रीय

वनविभागाने फायर अलर्ट यंत्रणा कार्यान्वित केली होती. कर्मचार्‍यांना अत्याधुनिक मोबाईल देण्यात आले आहेत. वनक्षेत्रात अथवा जंगलात आग लागल्यानंतर सॅटेलाईट व्दारे त्याची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकते. मात्र आजच्या  आगीबाबत  ही यंत्रणा निष्क्रीय व निरुपयोगी ठरल्याचे दिसून आले.त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.