Sat, Jul 20, 2019 10:44होमपेज › Sangli › राजेवाडीच्या सद‍्गुरू कारखान्याकडून शेतकर्‍याची तीन लाखांची फसवणूक

राजेवाडीच्या सद‍्गुरू कारखान्याकडून शेतकर्‍याची तीन लाखांची फसवणूक

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:46PMआटपाडी : प्रतिनिधी

तालुक्यातील राजेवाडी येथील सद‍्गुरू श्री श्री साखर कारखान्याच्या सभासदत्वासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे शेतकर्‍याची तीन लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. बिभीषण महादेव शिरकांडे (वय 42, रा. राजेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारखान्याचे पदाधिकारी, तसेच सांगलीच्या कॅनरा बँकेचे व्यवस्थापक व कर्मचार्‍यांवर  गुरुवारी आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की सद‍्गुरू साखर कारखान्याच्या स्थापनेदरम्यान चेअरमन एन. शेषागिरीराव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, संचालक श्रावणदादा वाक्षे यांनी कारखान्याचे सभासदत्व घेण्याचे आवाहन राजेवाडीतील शेतकर्‍यांना केले होते. सभासदत्व घेताना  शिरकांडे यांनी जमिनीचा सात-बारा, ओळखपत्र, फोटोसह अन्य कागदपत्रे आणि रोख पंधरा हजार रुपये दिले होते.

या कागदपत्रांच्या आधारे साखर कारखान्याच्या पदाधिकार्‍यांनी बोगस कागदपत्रे तयार केली. शिरकांडे यांच्या बोगस सह्या केल्या.सांगली येथील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापक व कर्मचार्‍यांना हाताशी धरुन शिरकांडे यांच्या नांवावर मार्च 2017 मध्ये कर्ज काढण्यात आले. हे कर्ज बँकेने नेट बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ कारखान्याच्या खात्यावर वर्ग केले.

या कर्जाचे हप्ते भरले नाहीत  म्हणून शिरकांडे आणि अन्य एका शेतकर्‍याला बँकेचे पत्र आले.इंग्रजीतील ते पत्र त्यांनी जाणकारांकडून वाचून घेतल्यावर त्यांना धक्काच बसला. आपल्या नांवावर कर्ज काढण्यात आल्याचे समजले. 

शिरकांडे यांनी याबाबत बँकेत जाऊन माहिती घेतली. त्यावेळी कारखान्याने  कर्ज काढल्याचे आणि ती रक्कम कारखान्याच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी आज सर्व कागदपत्रे बँकेकडून घेतली आणि कारखान्याचे पदाधिकारी आणि कॅनरा बँकेच्या सांगली येथील एका शाखेचे व्यवस्थापक व सहकर्‍यांनी संगनमताने फसवणूक केल्याची फिर्याद दिली.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजीव मोरे तपास करीत आहेत.