इस्लामपूर : संदीप माने
राज्यभर खा. राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनाला वाळवा तालुक्यातून राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्यामुळे तालुक्यातील राजकारणात ‘राष्ट्रवादी-स्वाभिमानी’ असा नवा राजकीय प्रवाह पुढे आला. यानिमित्ताने ना. सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आ. जयंतराव-खा. शेट्टी अशा सलगीची चर्चा सुरू झाली.
तालुक्यातील बहुतांशी सत्ता स्थानावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून गेल्या तीन दशकात जयंत पाटील यांनी या परिसरातून मोठ्या मताधिक्क्याने आपले प्रतिनिधीत्व अबाधित ठेवले आहे. इस्लामपुरात मात्र राष्ट्रवादीला हादरा बसल्याने तालुक्यातील भाजपने उचल खाल्ली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही इस्लामपुरात दौरे झाले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना लक्ष्य केले गेले. फडणवीस यांनी खोत यांना राज्यमंत्री पद दिल्याने तालुक्यात राष्ट्रवादी विरोधकांची ताकदही वाढत आहे.
दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी ना. खोत यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्यावर आंदोलन केले होते. आंदोलनानंतर खा. शेट्टी यांच्या स्वागताला पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, जि. प. सदस्य संजीव पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील या राष्ट्रवादीच्या मंडळींनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खा. शेट्टी आणि ना. खोत यांच्यातील दरी आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुंदावणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे दूध दराच्या आंदोलनातही राज्यातील सत्तारुढांच्या विरोधात एकत्र येण्याच्या निमित्ताने का होईना, पण या परिसरात (स्वाभिमानी?) राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी अशी ऐक्य एक्सप्रेस धावण्याची चिन्हे आहेत.
महाडिक गटाची सावध भूमिका...
ऊस दर, वाघवाडी-पेठ- जांभुळवाडी एमआयडीसीचा प्रश्न, वाघवाडी उड्डाण पूल यासाठी महाडिक गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. विकास आघाडीत महाडिक गटाची भूमिका निर्णायक आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात महाडिक गटाने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.