Sun, Aug 25, 2019 23:55होमपेज › Sangli › वाळवा मतदारसंघात नक्की परिवर्तन करू

वाळवा मतदारसंघात नक्की परिवर्तन करू

Published On: Mar 05 2018 1:44AM | Last Updated: Mar 04 2018 11:44PMइटकरे : वार्ताहर

आमच्यातील कोणीही कुठेही जात नाही. विकास आघाडीत फूट पडल्याच्या अफवावर विश्‍वास ठेवू नका. आघाडीच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत वाळव्यात नक्की परिवर्तन करू, असा विश्‍वास  ना. सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. 

येलूर  (ता. वाळवा)  येथे   मुख्यमंत्री    ग्रामीण पेयजल  योजनेअंतर्गत नळपाणीपुरवठा व भूमिपूजन तसेच शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  सम्राट महाडिक, दि. बा. पाटील, जि. प. सदस्य  निजाम मुलाणी, जगन्नाथ माळी, श्रीप्रसाद बारटक्के, राजन महाडिक  उपस्थित होते.

ना. खोत म्हणाले, मी व आ. शिवाजीराव नाईक यांनी शिराळा-वाळवा तालुक्यात पाणीपुरवठा योजना, रस्ते व इतर कामांसाठी अडीचशे कोटींवर निधी मंजूर करून आणला. मात्र आज आम्ही मंजूर केलेल्या कामाचे नारळ विरोधक फोडत सुटले आहेत.

ते काय म्हणतात याकडे आम्हाला पहायला वेळ नाही. येत्या 15 दिवसात वाकुर्डे योजनेचे कामाचे टेंडर निघेल. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघवाडी  येथे क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजन घेणार आहे. या ठिकाणी नाना पाटील यांचा पुतळा उभारणार आहे. 

आ. शिवाजीराव  नाईक  म्हणाले, विरोधकांना आत्ता काहीच काम नसल्यामुळे ते टीका करीत सुटले आहेत. सदाभाऊ  मंत्री झाल्याने काहींना पोटशूळ  उठला आहे. नानासाहेब महाडिक, संग्रामसिंह देशमुख, माजी आ. शि. द. पाटील,  सी. बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. 

स्वागत व प्रास्ताविक राहुल महाडिक यांनी केले. यावेळी माजी सरपंच जे. टी. महाडिक, धनाजीराव पाटील, भास्करराव  पाटील, भगवानराव जाधव, जे. व्ही. गायकवाड, सरपंच कमल आडके, उपसरपंच  बाळासाहेब जाधव, विनायक  महाडिक, सरदार  गायकवाड, प्रकाश माळी, शहाजी पाटील उपस्थित होते.