होमपेज › Sangli › साखर निर्यातीसाठी अनुदान द्या

साखर निर्यातीसाठी अनुदान द्या

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 7:21PMइस्लामपूर : वार्ताहर

साखरेला योग्य दर मिळण्याबरोबरच ते स्थिर राखण्यासाठी साखरेच्या निर्यातीला मंजुरी देण्यासह निर्यात अनुदान देण्याची मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. ना. प्रभू यांची दिल्ली येथे ना. खोत यांनी भेट घेतली. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी उपस्थित होते. या मागणीचा केंद्र सरकार सकारात्मकपणे विचार करील, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले.

ना. खोत यांनी त्यांना सांगितले की, सद्यस्थितीत खुल्या बाजारात साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दर 2 हजार 800 रुपयांच्या दरम्यान आहेत. साखर कारखान्यांचा उत्पादन खर्चही यातून निघत नाही. ना. खोत म्हणाले,  साखरेचे भाव स्थिर करण्यासाठी 20 लाख टन साखर निर्यात करणे, रिफाईन्ड (पक्क्या) साखरेसाठी 500 रुपये प्रति क्विंटल आणि कच्च्या साखरेसाठी 1 हजार रुपये प्रति क्विंटल निर्यात अनुदान द्यावे. आयातीवर 100 टक्के आयात शुल्क लावावे. निर्यातीवरील शुल्क रद्द करावे अशी त्यांनी शेवटी मागणी केली.