Mon, Nov 19, 2018 18:59



होमपेज › Sangli › सचिन सावंतसह टोळीला मोक्‍का

सचिन सावंतसह टोळीला मोक्‍का

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 11:46PM

बुकमार्क करा





सांगली : प्रतिनिधी

शहरातील सावंत प्लॉट परिसरात आर्थिक वादातून शकील मकानदारचा खून केल्याप्रकरणी नगरसेवक सचिन सावंतसह अकरा जणांच्या टोळीवर मोक्‍काअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला नांगरे-पाटील यांनी परवानगी दिल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांनी सांगितले. सचिन रमाकांत सावंत, शाम बापू हत्तीकर, सौरभ संजीवकुमार शितोळे, करण बाळू शिंदे, माजिद ऊर्फ इम्रान मज्जिद आवटी, सिद्धार्थ भास्कर कांबळे, विशाल ऊर्फ गौरव विजय गायकवाड, नागेश विजय ऐदाळे, विशाल बाळू कांबळे, सुनील नारायण कांबळे अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास सावंत प्लॉट परिसरात शकील मकानदार याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंड बाळू ऊर्फ महेंद्र भोकरे याने फिर्याद दिली होती. शकील मकानदार पूर्वी सचिन सावंत याच्या टोळीसाठी काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी शकीलचा सचिन सावंत याच्याशी आर्थिक कारणावरून वाद झाला होता. दरम्यान बाळू भोकरे आणि सचिन सावंत यांचाही वाद झाल्याने दाद्या सावंतची टोळी फुटली होती. 

सचिन सावंतशी वाद झाल्यानंतर शकीलने बाळूशी जवळिक वाढविली होती. त्याचा राग सावंतसह टोळीला होता. आर्थिक वाद आणि बाळू भोकरेशी जवळीक या रागातून सावंत टोळीने जांबिया, लोखंडी रॉड, काठ्यांनी बेदम मारहाण करून शकीलचा खून केला होता. त्यावेळी शकीलच्या मोटारसायकलची मोडतोडही करण्यात आली होती. 

त्यानंतर बाळू भोकरेने या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी सावंत सोडून अन्य संशयितांना तातडीने अटक करण्यात आली होती. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सचिन सावंतला अटक करण्यात आली. यातील सर्व संशयित सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. 

सावंतला अटक केल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, निरीक्षक प्रताप पोमण, उपनिरीक्षक जीवन राजगुरू, विशाल भिसे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.