Wed, Jun 26, 2019 03:49होमपेज › Sangli › सचिन सावंत टोळीला आज मोक्‍का न्यायालयात हजर करणार

सचिन सावंत टोळीला आज मोक्‍का न्यायालयात हजर करणार

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 11:22PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कुख्यात गुंड दाद्या सावंतचा भाऊ, माजी नगरसेवक सचिन सावंतसह दहा जणांच्या टोळीवर मोक्‍कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी पुण्यातील मोक्‍का न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांचे एक पथक सावंतसह टोळीला घेऊन पुण्याला रवाना झाले आहे. 

सचिन सावंत, शाम हत्तीकर, सौरभ शितोळे, करण शिंदे, माजिद ऊर्फ इम्रान आवटी, सिद्धार्थ कांबळे, विशाल ऊर्फ गौरव गायकवाड, नागेश ऐदाळे, विशाल कांबळे, सुनील कांबळे अशी मोक्‍कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मंजुरीनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला दि. 18 रोजी नांगरे-पाटील यांनी परवानगी दिली होती. त्यानुसार आता याबाबत मंगळवारी पुण्यातील मोक्का न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे. 

दि. 22 सप्टेंबर रोजी दुपारी सावंत प्लॉट परिसरात शकील मकानदार याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंड बाळू ऊर्फ महेंद्र भोकरे याने फिर्याद दिली होती. शकील मकानदार पूर्वी सावंत टोळीसाठी काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी शकीलचा सचिन सावंत याच्याशी आर्थिक कारणावरून वाद झाला होता. दरम्यान बाळू भोकरे आणि सचिन सावंत यांचाही वाद झाल्याने दाद्या सावंतची टोळी फुटली होती. सचिन सावंतशी वाद झाल्यानंतर शकीलने बाळूशी जवळीक वाढविली होती. त्याचा राग सावंतसह टोळीला होता. त्यातून त्याचा खून करण्यात आला होता.