Wed, Apr 24, 2019 07:47होमपेज › Sangli › एसटी बंदचा प्रवाशांना फटका

एसटी बंदचा प्रवाशांना फटका

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:37PMसांगली ः प्रतिनिधी

जिल्ह्यातील 4 हजार 800 एसटी कर्मचारी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एसटीची चाके थांबली आहेत. यामुळे महामंडळाचे सुमारे 75 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कवलापूर (ता. मिरज) येथे अज्ञातांनी बसवर केलेल्या दगडफेकीत चालक जखमी झाला.  

संपाची काहीच कल्पना नसल्यामुळे सकाळी सांगली एसटी बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती; मात्र संपामुळे प्रवाशांची अडचण झाली. पहाटेपासूनच बसस्थानक  परिसरात  पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बसस्थानकात जाण्यासाठी असलेल्या सर्व मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेडस् लावून प्रवेश बंद केला होता.

परगावी जाणार्‍या प्रवाशांनी संपामुळे खासगी वाहनांचा सहारा घेतला. वडापचा व्यवसाय जोरात सुरू होता. अव्वाच्या सव्वा दर प्रवाशांकडून आकारण्यात येत होता. खासगी वाहतूक करणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांनीदेखील वाढीव दर लावले होते. संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी झाले असून केवळ शिवसेनाप्रणीत एसटी वाहतूक सेनेचे कर्मचारी यामध्ये सहभागी झालेे नव्हते.  सांगली डेपोचा विचार केला, तर तेथून दररोज 359 एसटीच्या फेर्‍या होतात. मात्र, दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ दोनच फेर्‍या झाल्या होत्या. यामध्ये सांगली-नाशिक आणि सांगली-पुणे या गाडीचा समावेश होता. 

कवलापुरात बसवर दगडफेक

सकाळी पावणेदहाच्या सुमारास कवलापूर येथे आटपाडीहून सांगलीकडे येणार्‍या बसवर (एमएच 10 सीएच 7902) अज्ञातांनी दगडफेक केली. यामध्ये चालक प्रदीप दत्तात्रय खंडागळे (वय 55, रा. सांगोला) जखमी झाले आहेत. 

इस्लामपुरात 750 फेर्‍या रद्द

संपामुळे इस्लामपुर आगारात शुकशुकाट होता. बंद मुळे प्रवाशांचे हाल झाले.आगाराच्या सुमारे 750 एस.टी फेर्‍या रद्द झाल्याने आगाराचे 9 लाखांचे नुकसान झाले. ग्रामिण भागातील प्रवाशांचे हाल झाले. 
तासगावात काही फेर्‍या

तासगावमध्येही एसटी कर्मचार्‍यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला.  शुक्रवारी नेहमीप्रमाणे प्रवाशी आले असता बसस्थानकामध्ये सुरू झालेल्या संपाची माहिती मिळाल्यानंतर अनेकांना घरी परतावे लागले. 
आटपाडीत प्रवाशांचे हाल

आटपाडीत या आंदोलनाचा प्रवाशांना फटका बसला.  आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. आटपाडी बसस्थानकावरून मुक्कामी गेलेल्या आणि नियमित 10 बस सुटल्या. मात्र नंतर सेवा ठप्प झाली.