Sat, Aug 24, 2019 21:21होमपेज › Sangli › मांगले येथे एस.टी. पेटविली

मांगले येथे एस.टी. पेटविली

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AMसांगली : प्रतिनिधी/मांगले : वार्ताहर 

सांगली जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भडका उडाला. शिराळा तालुक्यात मांगले येथे आंदोलकांनी एस. टी. पेटवून दिली. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे अज्ञातांनी चार एस. टी. बसेसवर तुफानी दगडफेक केली. दरम्यान, तासगाव तालुक्यातील मांजर्डे, मिरज तालुक्यात काकडवाडी आदींसह अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला, तर पलूस येथे भर चौकात आंदोलकांनी राज्यमार्ग रोखून धरला. शुक्रवारी (आज) कडेगाव येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 

शिराळा तालुक्यातील मांगले येथे मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने शिराळा आगाराची एस. टी. बस पेटवून दिली. यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गावात दिवसभर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात  करण्यात आला होता. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी सहभागी गावकरी, तरुणांनी  फेरी काढली. चौकात टायर पेटवून शिराळा -कोडोली मार्गावर रास्ता 

रोको केला. मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी  प्राणांचे बलिदान देणारे कायगाव- कोडे (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या फेरीत हजारो तरुण तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. मात्र फेरीनंतर आंदोलनास हिंसक वळण लागले.  सकाळी पावणेदहाच्या सुमारास  चिकुर्डेकडून येणारी माले-शिराळा ही शिराळा आगाराची बस (क्र. एमएच 40 - 8931) ही बस संतप्त जमावाने प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर प्रवाशांना खाली उतरवरून पेटवून दिली.  यात या बसचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून बस विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक किशोर काळे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, गावातील दुकाने संस्था शाळा   दिवसभर बंद होत्या. गावात तणावपूर्ण शांतता होती.