Wed, Jul 24, 2019 12:21होमपेज › Sangli › एस. टी. वाहतूक ठप्पच

एस. टी. वाहतूक ठप्पच

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:32PMसांगली : प्रतिनिधी

वेतनवाढ व अन्य विविध मागण्यांसाठी  एस. टी. कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.  जिल्ह्यातील सुमारे चार हजार चालक, वाहक संपामध्ये सहभागी झाले आहेत. शनिवारी दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील  वाहतूक सेवा ठप्प झाली होती. एस. टी. महामंडळाने कर्मचार्‍यांवर निलंबनाचा बडगा उगारला असला तरी आता ‘आर या पार’ ची लढाई असल्याचे कर्मचार्‍यांनी बोलून दाखविले. दरम्यान, काही समाजकंटकांनी जिल्ह्यात चार ठिकाणी एस. टी. बसेवर दगडफेक करून नुकसान केले. 

कोणत्याही संघटनेला विश्‍वासात न घेता शासनाने एकतर्फी वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या एस. टी. च्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संपाची हाक दिली. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील एस. टी.ची यंत्रणा कोलमडली. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी तातडीने खासगी वाहतूक संघटनांची बैठक घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बसस्थानकाबाहेर वडापच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु  दुप्पट दरामुळे प्रवाशांची वडापमधून अक्षरश: लूट करण्यात येत आहे. तर कोणतीही नोटीस न देता कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यामुळे एस. टी. प्रशासनाने 40 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली. परंतु त्याचा संपावर कोणताही परिणाम झाला नाही.

शनिवारी विभाग नियंत्रक ताम्हणकर यांनी सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली. वेतनवाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय असल्याने विभागाचा संप मागे घ्यावे, असे आवाहन केले. परंतु त्याला प्रतिनिधींनी नकार दिला.  कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, असे सांगितले. 40 जणांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. शुक्रवारी झालेल्या संपामुळे विभागाचे सुमारे 60 लाखाचे नुकसान झाले. 

पाच ठिकाणी बसेसवर दगडफेक; दोन प्रवासी जखमी

शनिवारी सकाळी काही बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. शिरढोण फाटा, वाळवा फाटा, कुमठे फाटा, बोरगाव व तासगाव येथे बसेसवर समाजकंटकांनी  दगडफेक केली. त्यामुळे पाच बसेसच्या काचा फुटून  नुकसान झाले. त्यामध्ये दोन प्रवाशांना दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करून सोडण्यात आल्याची माहिती ताम्हनकर यांनी दिली. 

वडापवाल्यांकडून लूट

एस. टी. चा संप सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहतुकीला परवानगी दिली. त्यानुसार बसस्थानकाबाहेर वडाप लागल्या होत्या. परंतु त्यांच्याकडून प्रवाशांची लूट सुरू असल्याचे दिसून आले. सांगली - जयसिंगपूर 9 रुपये व सांगली-कोल्हापूर 51 रुपये एस. टी. चे भाडे आहे. परंतु वडापवाल्यांनी जयसिंगपूरचा दर 50 रुपये, तर कोल्हापूरचा दर हा 100 रुपये केला होता. त्यामुळे वडापचालकांकडून प्रवाशांची अक्षरश: लूट करण्यात येत होती.

महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचार्‍यांवर सर्वाधिक अन्याय

महाराष्ट्रात एस.टी. ची स्थापना होऊन 70 वर्षे पूर्ण झाली. ‘गाव तिथे एस.टी.’ असे म्हणून महामंडळाची गाडी गावागावांत पोहोचली. शालेय विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांचे आधार बनत अनेकांना एस. टी. ने मोठे केले. प्रसंगी तोटा सहन करून प्रवाशांना सुविधा दिल्या. या ठिकाणी कर्मचारी 20 ते 30 वर्षे  सेवा बजावत आहेत. परंतु निवृत्त होताना कोणाच्या चेहर्‍यावर समाधान नसते. कारण गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळाची वेतनवाढ तुटपुंजी करण्यात येत आहे. केलेला वेतनकरारही पाळला जात नाही. देशात अनेक ठिकाणी एस. टी. महामंडळे आहेत. परंतु त्या ठिकाणच्या कर्मचार्‍यांना पुरेसे वेतन दिले जाते. अन्य राज्यांचा वेतनवाढीचा तक्‍ता पाहिल्यास महाराष्ट्राच्या कर्मचार्‍यांवर अन्याय होतो, हे दिसून येईल. त्यामुळे एस. टी. कर्मचार्‍यांचे  शोषण होत आहे.

सांगा कसं जगायचं, तुम्हीच सांगा...

एस. टी. ही सरकारी नोकरी असल्याने आपले चांगले होईल, असे म्हणून 20 वर्षांपूर्वी वाहक म्हणून सांगली विभागात नोकरीला लागलो. सुरुवातीला 3500 रुपये पगार होता. 20 वर्षानंतर आता हा पगार 21 हजारावर गेला आहे. प्राव्हिडंड फंड, वर्गणी आदी वजा जाता 12 हजार रुपये हातामध्ये पडतात. त्यामध्ये मुलांचे शिक्षण, घरभाडे भागवावे लागते. यात आम्ही जगायचे तर कसे?     -  अनिल जाधव, सांगली (वाहक)

गेल्या आठ वर्षांपासून सांगली विभागात वाहक म्हणून काम करीत आहे. 13 हजार 678 रुपये सध्या पगार आहे. सर्व खर्च वजा जाता 9 हजार रुपये हातामध्ये पडतात. एवढ्या कमी पगारात कुटुंबाचे कसे भागवायचे, हा आमच्यासमोर प्रश्‍न आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. आज ना उद्या पगार वाढेल म्हणून काम करावे लागते. परंतु यामध्ये आमची सतत फसवणूक होत आलेली आहे. - प्रिया शिंदे, रोहिणी कोरे (वाहक)

मी मूळची कासेगाव येथील. आठ वर्षांपूर्वी सांगली विभागात वाहक या पदावर रूजू झाले. हातामध्ये केवळ 9 हजार रुपये पडतात. गाव सोडून सांगलीत राहावे लागत असल्याने पाच हजार रुपये घरभाडे द्यावे लागते. उर्वरित रकमेमध्ये घर कसे चालवायचे हा प्रश्‍न आहे. - माधुरी खोत (वाहक)

महापालिकेत एखादा कर्मचारी नोकरीस लागला तरी त्याला 19 हजार रुपये पगार आहे. आम्हाला मात्र अत्यंत तोकडे वेतन आहेत. वेतन करारानुसार वाढ होईल, असे वाटले होते. परंंतु सरकारने अचानक चुकीच्या पध्दतीने वाढ केलेली आहे. वास्तविक पाहता एका हाताने वेतनात वाढ केली आहे, तर दुसर्‍या हाताने भत्त्यामध्ये कपात करण्यात आली आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे आमच्यासमोर संपाशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही.  - अशोक मगदूम, रमेश वाघ,मल्लाप्पा सलगर (चालक)

देशातील अन्य राज्य व महाराष्ट्रातील वेतनाची स्थिती

राज्य              चालक (मूळ व एकूण वेतन)                वाहक (मूळ व एकूण वेतन)

कर्नाटक          मूळ (12,400 - 17,520)                    मूळ 11,640 - 15700
                     एकूण - 25,000 ते 30,000                 एकूण - 22,000 - 25,000

तेलंगणा         मूळ - 13,050 - 34, 490                     मूळ - 12,340 - 32,800
                    एकूण - 31,000 - 60,000                    एकूण 25,000 - 55,000

राजस्थान       मूळ - 7,200 - 20, 200                       मूळ 7,200 - 20,200
                    एकूण - 17,496 - 49,086                    एकूण - 17,496 - 49,086

उत्तरप्रदेश        मूळ - 5,200 - 20,200                       मूळ - 5,200 - 20,200
                     एकूण - 12,636 - 49,086                   एकूण - 12,636 - 49,086

महाराष्ट्र          मूळ - 4,700 - 13,367                        मूळ - 4350 - 14,225
                     एकूण 11,500- 32,481                      एकूण 10,570 - 34,566