Fri, Apr 26, 2019 18:11होमपेज › Sangli › एस. टी. कर्मचार्‍यांचा आजपासून अघोषित संप

एस. टी. कर्मचार्‍यांचा आजपासून अघोषित संप

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:35PMसांगली : प्रतिनिधी

एस. टी. कर्मचार्‍यांना वेतनवाढीसंदर्भात कोणत्याही मान्यताप्राप्त संघटनेशी सरकारने चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतला आहे. तसेच सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आदी विविध मागण्यांसाठी एस. टी.च्या संघटनांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला आहे. त्यामुळे एस. टी.ची चाके पुन्हा एकदा थांबणार आहेत. आता आर या पारची लढाई करण्याच्या तयारीत कर्मचारी उतरला आहे. 

एस. टी. कर्मचार्‍यांचा वेतनवाढीचा करार संपून दोन वर्षे झाली. कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शिवशाहीच्या माध्यमातून एस. टी. चे होणारे खासगीकरण थांबवावे आदी मागण्यांसाठी एस. टी. कर्मचार्‍यांनी संघटनांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी संपाचे हत्यार उपसले होते. कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या प्रश्‍नासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्‍वासन देऊन संप माघार घेण्यास भाग पाडले होते. परंतु, सरकारने एक वर्षानंतर कोणत्याही मान्यता प्राप्त संघटनेशी वेतनवाढीसंदर्भात चर्चा न करता एकतर्फी निर्णय जाहीर केला. अगोदर कर्मचार्‍यांना तुटपुंजा पगार मिळतो. सध्या चालकाला 13 हजार 770 रुपये पगार आहे.

हाच पगार आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात 19 हजार रुपये आहे. तेवढा तरी पगार द्यावा, अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. परंतु सरकारने पगारात तुटपुंजी वाढ करून एकतर्फी निर्णय घेतला आहे. एकप्रकारे कामगार संघटना मोडीत काढण्याचा डाव सरकारचा आहे. त्यामुळे संपाची कोणतीही नोटिस न देता गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. आता सरकारने कारवाई केली तरी चालेल, असा निर्णय घेऊन कामगार संपात उतरणार असल्याची माहिती कामगार संघटनेच्या नेत्यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा एस. टी. ची चाके थांबणार आहेत.