Sat, May 30, 2020 11:14होमपेज › Sangli › अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखा

अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखा

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 03 2018 11:38PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

अफवांवर विश्‍वास ठेवू नका. शांतता आणि सलोख्याचे वातावरण कायम राखा. तुमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगा,  असे आवाहन  आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, पोेलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण आदिंनी  केले. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.   

भीमा- कोरेगाव येथील घटनांच्या निषेधार्थ सांगलीत पुकारलेल्या आजच्या बंद वेळी काही संघटना रस्त्यावर उतरल्या. त्यातून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यात  पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.  त्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. बैठकीस विविध  संघटना, शिवसेना, शिवप्रतिष्ठान आदी संघटनांचे कार्यकर्त्यांंना निमंत्रित करण्यात आले होते.  यावेळी महापौर हारुण शिकलगार, माजी महापौर विवेक कांबळे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनसेचे प्रियानंद कांबळे, सचिन सव्वाखंडे, शिवसेनेचे बजरंग पाटील, संदीप सुतार आदि उपस्थित होते. 

सांगलीत आज झालेला प्रकार हा दुर्दैवी असून तो कसा आणि का झाला यावर चर्चा न करता यापुढील काळात शांतता कशी राहील, यासाठी सर्वांनी एकत्र  प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. बैठकीनंतर आमदार गाडगीळ आणि पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, अपवाद वगळता सांगलीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. ज्या ठिकाणी अशा किरकोळ घटना घडल्या, त्यातील दोषींवर कायद्यानुसार कारवाई करू. आजच्या बैठकीत झालेल्या प्रकाराचा सर्वच संघटनांनी निषेध केला आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वांनी मान्य केले. 

ते म्हणाले,भीमा- कोरेगाव प्रकरणाची सरकार न्यायालयीन चौकशी करीत आहे. त्यावर विश्‍वास ठेवण्याचे सर्वांनी मान्य केले आहे.  नागरिकांची सुरक्षा सर्वोच्चस्थानी असून, सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. जनतेने आणि राजकीय पक्षांनी समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये.