Fri, Jul 19, 2019 22:52होमपेज › Sangli › आठ कोटींच्या निविदा ‘मॅनेज’चा घाट

आठ कोटींच्या निविदा ‘मॅनेज’चा घाट

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 8:21PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेच्या दलित वस्ती सुधार समितीसाठी आठ कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत. त्याच्या निविदा साखळी पद्धतीने मॅनेज करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी एका माजी नगरसेवकाने साखळी मॅनेजसाठी ठेकेदारांशी चर्चा सुरू ठेवली आहे. त्याने यासाठी काही रक्कमही जमा केल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.  डीपीसीमधून दलित वस्ती सुधार समितीसाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या या निधीतून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली गतिमान आहेत. 

परंतु या निविदा मॅनेजसाठी एका माजी नगरसेवकानेच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी हे काम त्याने सुबे- सोसायटीच्या 33.33.34 या महापालिका निकषानुसार वाटप करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्याने मजूर सोसायटीतर्गंत काही ठेकेदारांशी खुलेआम चर्चा सुरू केल्या आहेत. यातून प्रशासनाशी संगनमताने ठेकेदारांना थेट कामाचे वाटप करण्याचा घाट घातला आहे. सोबतच काही हॉटमिक्सची कामे जाहीर निविदा पद्धतीने काढण्यात येणार आहेत. 

एकूणच या निविदा मॅनेज करण्यासाठी ठेकेदारांकडून 10 ते 15 टक्के रक्कम जमा करण्याच्या हालचाली सुरू असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून या माजी नगरसेवकाने महापालिकेत वारंवार फेर्‍या सुरू केल्या आहेत. अनेकवेळा त्यासाठी तास न् तास ठिय्याही मारला आहे. या मॅनेज कारभाराला अडथळा येऊ नये यासाठी त्याने समितीच्या विद्यमान सदस्य व पदाधिकार्‍यांनाही डावात घेण्यासाठी मोहीम आखली आहे. निवडणुकीपूर्वी ही ‘गेम’ यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू आहे.

या मॅनेज कारभाराची माहिती महापौर हारुण शिकलगार यांना मिळाली. त्यांनी या माजी नगरसेवकाला पाठबळ देणार्‍या विद्यमान नगरसेवकाची दूरध्वनी-वरून झाडाझडती केली. तसेच ही कामे पारदर्शीपणे होण्यासाठी आयुक्त खेबुडकर यांनाही जाहीर निविदा काढण्याची सूचना केली. 

Tags : Sangli, Sagli News, Rs 8 crores, sanctioned, Dalit Residents, Improvement Committee