Sun, Jul 21, 2019 10:45होमपेज › Sangli › रोस्टर अखेर मंजूर; निवडणुकीनंतर नोकरभरती

रोस्टर अखेर मंजूर; निवडणुकीनंतर नोकरभरती

Published On: Jun 03 2018 1:19AM | Last Updated: Jun 02 2018 11:01PMसांगली : प्रतिनिधी

अनेक वर्षे रखडलेले महापालिकेचे कर्मचारी रोस्टर (पदनिहाय आस्थापना बिंदुनामावली) पूर्ण झाले आहे. त्यावर  राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पुणे विभागाने शिक्कामोर्तबही केले आहे. आता ते रोस्टर आणण्यासाठी सोमवारी कामगार अधिकारी पुण्याला जाणार आहेत. रोस्टर मंजुरीमुळे आता पदोन्नतीसह भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकीनंतरच पदोन्नती व तीनशेहून अधिक रिक्‍त जागांची भरती होणार असल्याचे समजते. यामुळे नोकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या पदधिकारी, सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड या स्वतंत्र नगरपालिका असताना अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते.  गेल्या 20 वर्षांत अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. होत आहेत. दरवर्षी 40 ते 60 अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नोकरभरती करण्याबाबतचा अनेक विषय  चर्चेत आहे. 

परंतु रोस्टर पूर्ण नसल्याचे तसेच आस्थापना खर्च उत्पन्नाच्या तुलनेत जादा असल्याचे कारण पुढे येत होते. त्यामुळे भरतीला शासनाने वारंवार  नकार दिला होता.  एक जून रोजी 17 कर्मचारी निवृत्त झाले.  आस्थापनेतील 675 रिक्‍त जागा आहेत. परिणामी एकेका कर्मचार्‍याला सात-आठ पदभार सांभाळण्याची वेळ आली आहे. विशेषतः आरोग्य विभागात सर्वाधिक कर्मचारी निवृत्त झाल्याने स्वच्छता, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. 

प्रशासनाने गेल्या सात-आठ वर्षांपासून महापालिकेचे रोस्टर पूर्ण करण्याचे काम सुरू केले होते. त्यामध्ये नेमक्या किती जागा रिक्‍त आहेत, कोणत्या  रिक्‍त आहेत, याची माहिती जमा करण्याचे काम आस्थापना विभागाकडून सुरू होते. 

परंतु प्रशासनाकडून रोस्टर निर्मिती व शासनाकडे पाठपुराव्याला दिरंगाई सुरू होती. यामुळे भरतीला विलंब लागला. त्यामुळे अनेकजण पदोन्नतीस पात्र असूनही रोस्टरमंजुरीअभावी वंचित राहिले होते. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे महापालिकेची कामेच ठप्प होण्याची वेळ आली होती. त्यामुळे  महासभा, स्थायी सभेत सदस्यांसह पदाधिकार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. 

आयुक्‍त खेबुडकर यांनी  रोस्टर निर्मितीला गती दिली. गेल्यावर्षीच प्रक्रिया पूर्ण करून नोकरभरती करू, असेही आयुक्‍त खेबुडकर व महापौर हारुण शिकलगार यांनी स्पष्ट केले होते. मात्र मुहूर्त निघाला नाही. उलट गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ वारंवार त्रुटी पूर्ण करीत राज्य मागासवर्गीय आयोगाच्या पुणे कार्यालयात रोस्टर मंजुरीसाठी हेलपाटे सुरू होते. अखेर शासनाने  त्रुटींबाबत घेतलेले आक्षेप आता दूर झाले आहेत. 

यापूर्वीच आयुक्‍त खेबूडकर यांनी पदोन्नतीची यादी तयार करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत. पदोन्नतीनंतर खर्‍या अर्थाने चतुर्थश्रेणीतील कर्मचारी भरतीसाठी रिक्त जागांची संख्या निश्‍चित होणार आहे.  आता अनेकजणांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे.