Tue, May 21, 2019 18:56होमपेज › Sangli › कुरळपमध्ये दरोडा; पती-पत्नीला मारहाण

कुरळपमध्ये दरोडा; पती-पत्नीला मारहाण

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 11:50PMकुरळप : वार्ताहर

कुरळप ( ता. वाळवा) येथील सूर्यवंशी मळ्यातील प्रकाश निवृत्ती सूर्यवंशी यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री आठ ते दहा जणांच्या टोळीने दरोडा घातला. घराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत घुसले. पती-पत्नीस मारहाण केली. त्यांचे हातपाय बांधून  रोख रक्‍कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 80 हजारांचा  मुद्देमाल लुटून नेला.  

घटनास्थळावरून व कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी :  प्रकाश  सूर्यवंशी  कुंडलवाडी रस्त्यावरील सूर्यवंशी मळ्यात राहतात. मंगळवारी मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी  घराचा दरवाजा मोठा दगड घालून तोडला व  घरात प्रवेश केला. त्यांनी प्रकाश व त्यांच्या पत्नी जयश्री यांना लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण सुरू केली. तसेच घरातील सोने व पैसे देण्याची मागणी केली. दोघांनी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी दरोडेखोरांनी साडीने व प्लास्टिकच्या टेपने दोघांचे हातपाय बांधले. प्रकाश यांना हॉलमध्ये व जयश्री यांना किचनमध्ये डांबून ठेवले. एकाने घरातीलच विळा घेऊन प्रकाश यांच्या गळ्याला  आणि ‘ओरडलास तर जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. फ्रीज व कपाटात ठेवलेले सोळा हजार रुपये ,  चांदीचे पैंजण तसेच जयश्री यांच्या गळ्यातील  मंगळसूत्र, टॉप्स जबरदस्तीने काढून घेतले व  पलायन केले. जाताना त्यांनी सूर्यवंशी यांचा मोबाईल गोबरगॅसमध्ये टाकला. 

दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीने आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. सूर्यवंशी यांनी बुधवारी सकाळी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दरोडेखोरांचा तपास सुरू केला. मात्र रात्रीपर्यंत या दरोडेखोरांचा काहीच माग लागला नव्हता. सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाटील तपास करीत आहेत.