Fri, Jul 19, 2019 18:35होमपेज › Sangli › तिघा दरोडेखोरांना जमावाचा चोप

तिघा दरोडेखोरांना जमावाचा चोप

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:19AMजत: प्रतिनिधी

शहरातील निगडी कॉर्नर या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या किराणा दुकानावर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दुकानदाराच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्यावर हल्‍ला करण्यात आला. दुकानदार व नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. काही धाडसी तरुणांनी तिघा दरोडेखोरांना शिताफीने पकडले. त्यांना नागरिकांनी चांगलाच चोप दिला. दोघे जण पसार झाले. नागरिकांच्या मारहाणीत दरोडेखोर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

सिद्धार्थ दत्ता चव्हाण, बाबू विष्णू काळे (दोघे रा. पारधीतांडा, जत) व वसंत रतन पवार (रा. पुणे) यांच्यावर जत पोलिसांत दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या निगडी कॉर्नर येथे श्रीमंत साळे यांचे भाग्यश्री किराणा दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री पाचजणांनी या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला.  तिघा दरोडेखोरांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. त्यावेळी साळे यांचा मुलगा प्रज्वल आत झोपलेला होता. पत्र्याचे आवाज येत असताना तो भीतीने दुकानाचे शटर उघडून बाहेर जाऊ लागला. त्याचवेळी दरोडेखोरांनी त्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्यावर हल्‍ला केला. परंतु प्रज्वल जीव वाचवून बाहेर पळाला. दरम्यान फोन केल्यामुळे शेजारचे अनेक दुकानदार व नागरिक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानास सर्व बाजूंनी घेराव घातला. 

दरोड्यासाठी आलेले दोघेजण बाहेर टेहळणीसाठी थांबले होते. नागरिक गोळा होताच त्यांनी पलायन केले. नागरिकांची गर्दी होताच दुकानात शिरलेले तिघेजण छतावर चढून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र दुकानास सर्व बाजूंनी नागरिकांनी वेढा घातला होता. काही तरूण व नागरिकांनी धाडसाने पळून जाणार्‍या तिघा दरोडेखोरांना पकडले. नागरिकांनी चोरट्यांची चांगलीच धुलाई केली. काहीवेळात पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी चोरट्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले.

संशयितांना सुरूवातीस जत ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांची रवानगी मिरज शासकीय रूग्णालयात करण्यात आली आहे. दरोड्यासाठी त्यांनी वापरलेली कटावणी, लोखंडी गज, मिरची पावडर जप्‍त करण्यात आली आहे.

कुत्र्यावर विषप्रयोग

निगडी कॉर्नरला अनेक दुकाने आहेत. पाठीमागे जागेचे मालक राहतात. त्यांचा कुत्रा रात्रीच्यावेळी कोणासही फिरकू देत नाही. दरोडा टाकण्यापूर्वीॅ मांसाच्या तुकड्याला विष लावून कुत्र्यास टाकला होता. मात्र कुत्र्याने तुकडा न खाता भुंकण्यास सुरूवात केली. त्यामुळे दुकानदारांना जाग आली. त्यामुळे दरोड्याचा डाव उधळला.

दरोडा, खूनाचा प्रयत्न

सिध्दार्थ चव्हाण, बाबू काळे, वसंत पवार या तिघा संशयितांच्या विरोधात जत पोलिसात दरोडा व खूनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणखी दोन फरारी संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन कांबळे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.