Sun, Mar 24, 2019 16:52होमपेज › Sangli › राजोबाचीवाडी येथे दरोडा; अडीच लाखांचा ऐवज लुटला

राजोबाचीवाडी येथे दरोडा; अडीच लाखांचा ऐवज लुटला

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:21PMमाडग्याळ : वार्ताहर    

जत तालुक्यातील राजोबाचीवाडी येथील रामा मनगिणी ढेंबरे यांच्या घरावर शुक्रवारी मध्यरात्री दहा जणांच्या टोळीने  सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्‍कम, सोने-चांदीचे दागिने असा 2 लाख 71 हजारांचा ऐवज लुटला.  चाकू, तलवारीचा धाक दाखवत तिघांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली.  रामा ढेंबरे (वय 51), त्यांच्या पत्नी सुंदराबाई व नातू सुशांत खंडू नवत्रे  हे तिघे मारहाणीत जखमी झाले. 

घटनास्थळावरून व जत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी  ः रामा ढेंबरे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी माडग्याळ येथील आठवडा बाजार करून सायंकाळी ते घरी आले होते.ते,  त्यांची पत्नी सुंदराबाई, नातू सुशांत असे सर्वजण जेवण करून अंगणात झोपी गेले. 

मध्यरात्री आठ ते दहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने हातामध्ये तलवारी, चाकू अशी हत्यारे घेऊन ढेंबरे यांच्या घरात प्रवेश केला. रामा ढेंबरे यांचा गळा चौघांनी अचानक  आवळून धरला व त्यांचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.   ढेंबरे  आरडाओरडा करू लागले. त्यांचा आवाज  सुंदराबाई जाग्या झाल्या. त्यांना व नातू सुशांत यालाही दरोडेखोरांनी  तलवारीचा धाक दाखवून दोरीने बांधले.  

त्यानंतर दरोडेखोरांनी  ढेंबरे यांना पुन्हा मारहाण करून पैशांची मागणी केली. ढेंबरे यांच्याकडे म्हैस विकून आलेले साठ हजार, भाजीपाला व्यापारातून मिळालेले साठ हजार व मित्र आण्णाप्पा बंडगर यांच्याकडून  उसनवार घेतलेले वीस हजार असे एकूण एक लाख चाळीस हजार रूपये होते. ते त्यांनी घाबरून दरोडेखोरांना  दिले.

 दरोडेखोरांनी नातू सुशांत याच्याकडील तिजोरीची किल्ली काढून घेतली. तिजोरीतून पैसे काढून घेतले. त्यानंतर  घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले.  ढेंबरे यांच्या गऴ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन, चांदीचे ब्रेसलेट व कमरेचा नऊ तोळ्यांचा चांदीचा करदोडा आणि हातातील घड्याळ काढून घेतले. 

कपाटात  ठेवलेले दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने,  एक तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची बोरमाळ, बुगड्या, कर्णफुले, वेल असे साडेचार तोळ्याचे दागिने हिसकावून घेतले.एक तासभर धिंगाणा घातल्यानंतर दरोडेखोरांनी पुन्हा  ढेंबरे यांच्याकडे मोर्चा वळविला. त्यांना पुन्हा बेदम मारहाण  केली. तिघांचेही हातपाय बांधून सर्वजण पसार झाले. 

काही वेळानंतर सुंदराबाई यांनी हाताला बांधलेली दोरी हिसडा देऊन तोडली व  स्वत:ला  सोडवले. त्यांनी  पती व नातू  या दोघांना सोडविले. त्यानंतर तिघांनीही आरडाओरडा करून वस्तीवरील रहिवाशांना जागे केले.  पोलिसांना फोन केला.  ढेंबरे यांना तातडीने जत  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

उपविभागीय पोलिस उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने तपासाबाबत सुचना दिल्या. तेजू  श्‍वानाने ढेंबरे यांच्या शेतातून माडग्याळ -आसंगी रस्त्यापर्यत माग दाखविला. दरोडेखोरांना तातडीने अटक करू, असे आश्‍वासन वाकुडे यांनी दिले.