Sun, Jul 05, 2020 05:56होमपेज › Sangli › सांगलीत महिलेसह दोघांना लुटले

सांगलीत महिलेसह दोघांना लुटले

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:11AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर रस्त्यावरून निघालेली जीप अडवून त्यातील तिघांना कोयत्याचा धाक दाखवून 70 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वसंतदादा औद्योगिक वसाहतीत मोपेडवरून निघालेल्या महिलेची पर्स लांबविण्यात आली. पंधरा हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोल्हापूर रस्त्यावर झालेल्या वाटमारीप्रकरणी गणेश बंडू कावसकर (वय 25, रा. उरळी-कांचन, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. कावसकर हॉटेल व्यावसायिक आहेत. बुधवारी ते कामानिमित्त कोल्हापूर येथे गेले होते. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास ते जीपमधून दोन मित्रांसह कोल्हापूरहून सांगलीकडे येत होते. 

आकाशवाणी केंद्राजवळ आल्यानंतर दोन मोटारसायकलवरून चौघे जण त्यांच्या पाठीमागून आले. त्यांनी मोटारसायकली आडव्या मारून जीप  थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर चौघांनी कावसकर यांच्यासह त्यांच्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्या हातातील दीड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मोबाईल, 13 हजारांची रोकड असा 70 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. त्यानंतर चौघेही मोटारसायकलवरून निघून गेले. 

घाबरलेल्या कावसकर यांनी शहर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.  पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तातडीने हालचाली करून शहर परिसरात नाकाबंदी केली. त्याशिवाय गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले; मात्र सकाळपर्यंत शोध घेऊनही चोरटे सापडले नाहीत. याप्रकरणी अज्ञातांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील लुटीप्रकरणी शिल्पा सुरेश गौडा (वय 34, रा. गणेशनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. गौडा बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या मुलाला सोडण्यासाठी मोपेडवरून शालिनीनगर येथे गेल्या होत्या. तेथे मुलाला सोडून त्या वसंतदादा औद्योगिक वसाहत मार्गे  परत येत होत्या. 

वसाहतीत आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यापैकी मागे बसलेल्याने गौडा यांच्या दुचाकीच्या हँडलला अडकविलेली पर्स हिसडा मारून ओढून नेली. पर्समध्ये दोन मोबाईल, साडेतीन हजारांची रोकड असा ऐवज होता. त्यानंतर रात्री उशिरा गौडा यांनी याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.