Fri, Apr 26, 2019 01:41होमपेज › Sangli › अन्यथा तीन वर्षे नळ, ड्रेनेज कनेक्शन बंद

अन्यथा तीन वर्षे नळ, ड्रेनेज कनेक्शन बंद

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 10:12PMसांगली : प्रतिनिधी

शहरात रस्त्यांची दुरुस्तीची, डांबरीकरणाची  कामे होतात.त्यानंतर पुन्हा पाणीपुरवठ्याच्या नळ जोडणीसाठी किंवा ड्रेनेजला जोडण्यासाठी खोदकाम होते. परिणामी रस्ते पुन्हा खराब होतात. या नेहमी होणार्‍या प्रकारांना  आळा घालण्यासाठी महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. 

रस्तेकाम होण्यापूर्वी नागरिकांनी स्वतः नळजोडणी करून घ्याव्यात. अन्यथा रस्तेकामे झाल्यानंतर तीन वर्षे नळ कनेक्शन आणि ड्रेनेज कनेक्शन मिळणार नाही, असे फर्मान काढले आहे. 

जर कुणी परस्पर रस्ते खोदकाम केले तर तीन वर्षे फौजदारी कारवाई करू, असा इशारा पाणीपुरवठा व जलनि:स्सारण विभागाचे अभियंता शीतल उपाध्ये यांनी दिला आहे.

ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात ड्रेनेज, पाणी योजना आणि केबल खोदाईच्या निमित्ताने रस्ते खराब झाले होते. त्यामुळे शहर खड्डेमय बनले होते. उपनगरांत तर रस्त्यांची चाळणच झाली होती. आता महापालिकेमार्फत 24 कोटी आणि शासनामार्फत 33 कोटी निधीतून रस्ते कामे होत आहेत. काही कामेही झाली आहेत. 

उपाध्ये म्हणाले, यामध्ये प्रामुख्याने मिरजेतील अनेक उपनगरात रस्ते ड्रेनेजकामांसाठी खोदण्यात आले आहेत. सांगलीत शामरावनगर, धामणी रस्ता परिसर, कारखाना परिसरात अनेक ठिकाणी  ड्रेनेज कामे झाली आहेत. तेथे आता रस्ते कामे होणार आहेत. 

ते म्हणाले, ही रस्ते कामे दर्जेदार आणि टिकाऊ व्हावीत, यासाठी आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी सक्‍त सूचना दिल्या आहेत. त्यासाठी ठेकेदारांवर तीन वर्षे देखभाल व  दुरुस्तीची जबाबदारी (डिफेक्ट लायॅबलिटी) निश्‍चित केली आहे. त्यामुळे ही रस्तेकामे होण्यापूर्वीच  या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य लाईनपासून व्यक्‍तिगत नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन जोडून घ्यावीत.  तसेच अन्य कामांची दुरुस्ती करून घ्यावी. यासाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 

उपाध्ये म्हणाले, ही रस्तेकाम झाल्यानंतर नागरिकांना नळ, ड्रेनेज कनेक्शन 3 वर्षे कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. त्यासाठी रस्ते खोदाई करू देणार नाही. जर परस्पर रस्ता उकरला तर फौजदारी कारवाई करण्यात येईल.