Sun, May 31, 2020 19:19होमपेज › Sangli › भाजपने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग

भाजपने फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:22AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीचे मैदान भाजप शंभर टक्के जिंकेल. जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील यांनी सांगलीत लक्ष घालू नये. त्यांनी त्यांचे मतदारसंघ सांभाळावेत, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जाहीर कार्यक्रमात दिला. 

भाजपनेते माजी आमदार दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला.  स्टेशन चौकात झालेल्या या कार्यक्रमात भाजपच्या सर्वच नेत्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुकले आणि प्रचाराचा जणू नारळच फोडला. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, अशी घोषणाही केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सर्वश्री सुधीर गाडगीळ,  विलासराव जगताप, सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, जि. प. अध्यक्ष संग्राम देशमुख आदी उपस्थित होते. 

ना. पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निष्क्रिय नेत्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातील पंचायत समिती आणि नगरपालिकेची सत्ता त्यांच्या हातातून गेली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी एकजुटीने लढत दिल्यास विरोधकांचे डिपॉझीटही शिल्लक राहणार नाही. आजपासूनच भाजपचा निवडणूक प्रचार सुरू झाला, असे समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मी स्वतः या निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार आहे. सातत्याने सांगलीत येणार आहे. 
ना. देशमुख म्हणाले , महापालिका क्षेत्रातील विकासकामासाठी 33 कोटी रुपये दिले आहेत. काँग्रेसवाले त्यावरही डल्ला मारण्याच्या विचारात आहेत. आजपर्यंत त्यांनी हाच उद्योग केला आहे. आमदार गाडगीळ म्हणाले, चांगले उमेदवार देऊ,  विकासाचे व्हीजन मांडू आणि महापालिका ताब्यात घेऊ. दिनकर पाटील म्हणाले, महापालिकेत भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल.