Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Sangli › आघाडीला हटवून मनपा भ्रष्टाचारमुक्‍त करा

आघाडीला हटवून मनपा भ्रष्टाचारमुक्‍त करा

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 11:13PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका स्थापनेपासून सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने वाट्टेल  ते केले.  भ्रष्टाचार पोसला. यातून  सांगली शहराला दुरवस्थेतील खेडेच बनविले आहे, अशी टीका  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. अशा भ्रष्ट आणि निष्क्रीय आघाडीला या महापालिका निवडणुकीत लाथाडून शहराच्या विकासाचा अडथळा दूर करा, असे आवाहन त्यांनी केले. सांगलीत भाजपच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव शिंदे, श्रीकांत शिंदे, महिला प्रदेश सरचिटणीस सौ. भारती दिगडे आदि उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, जनतेने शहराच्या विकासाची काँग्रेस-राष्ट्रवादीला 20 वर्षे संधी दिली. पण दुर्दैवाने त्यांच्या नगरसेवक आणि नेत्यांकडे  विकासाचे कोणतेही व्हिजन नव्हते. प्रामाणिक दृष्टीच नव्हती. फक्‍त महापालिकेतील सत्ता म्हणजे लुटीचे दुकानच बनविले. यातून शहराची दुरवस्था करून ठेवली आहे. शहरात चांगले रस्ते नाहीत. आरोग्य सुविधांचा बोजवारा आहे. मलेरिया, डेंग्यूचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. कोणतेही उद्योग सांगलीत यायला तयार नाहीत. 

ते म्हणाले, वास्तविक सांगली सर्वाधिक जुनी महापालिका आहे. त्या तुलनेत नाशिक, औरंगाबादसह अनेक महापालिका स्पर्धेत कुठल्या कुठे पोहोचल्या. कोल्हापुरात आम्ही पहिल्याच प्रयत्नात 33 नगरसेवकांपर्यंत पोहोचलो. सत्ता नसली तरी तेथे विकासगंगा वाहती आहे. पण सांगली दुरवस्था असलेले मोठे खेडे बनले आहे. त्यामुळे आम्हाला एकदा संधी द्या. केंद्र, राज्यातील सत्तेद्वारे विकासाचा येथे पाऊस पडेल. यात सांगली कुठच्या कुठे पोहोचेल.
ना. पाटील म्हणाले, नेते म्हणून मी, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री येथे प्रचारासाठी येतील. पण त्याने मते मिळत नाहीत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरा-घरापर्यंत जाऊन केंद्र, राज्यातील सत्तेमधून झालेल्या विकासकामांचा आणि परिवर्तनाचा अहवाल पोहोचवा. त्यासाठी रात्रीचा दिवस करा. 

अध्यक्ष नात्याने माझीच जबाबदारी

आमदार गाडगीळ म्हणाले, या निवडणुकीत इच्छुक भरपूर होते. तब्बल 780 इच्छुकांतून  78 जणांना संधी देताना साहजिकच अनेकांना नाराज करावे लागले. अर्थात शहर जिल्हाध्यक्ष म्हणून ही सर्व जबाबदारी माझी आहे. पण त्यांना महापालिकेची सत्ता आल्यास पुढे समित्यांसह विविध ठिकाणी संधी देता येईल. यामुळे कोणी नाराज न होता कामाला लागावे.
दिनकर पाटील म्हणाले, काँगेस-राष्ट्रवादीने सत्तेतून केवळ तुंबड्या भरायचा उद्योग  केला आहे. तो बंद करण्यासाठीच आता परिवर्तनाची गरज आहे. सत्ताधार्‍यांबद्दल जनतेत फार मोठी नाराजी आहे. आम्ही आयात उमेदवारांवरच अवलंबून असल्याचा आरोप काँगेस-राष्ट्रवादीने केला होता. पण आम्ही नवे चांगले चेहरे दिले आहेत.  निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी मिळाली आहे.