Tue, Nov 13, 2018 01:53होमपेज › Sangli › निवृत्त पोलिसांचा ग्रुप विमा, घरांसाठी प्रयत्नशील : जाधव

निवृत्त पोलिसांचा ग्रुप विमा, घरांसाठी प्रयत्नशील : जाधव

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

सेवानिवृत्तीनंतर मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. स्वतःचे मानसिक, शारिरीक व सामाजिक स्वास्थ्य उत्तम राखल्यास उर्वरित आयुष्य आनंदात  जाईल. निवृत्त पोलिसांचा ग्रुप विमा तसेच त्यांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलिस आयुक्त, संघटनेचे राज्याध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले.

निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या पहिल्या वर्धापनदिनानिमत्त पोलिस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल येथे आयोजित मेळाव्यात अध्यक्ष्यस्थानावरून  ते बोलत होते. जाधव म्हणाले, निवृत्त पोलिसांनी एकीचे बळ लक्षात घ्यावे. कार्यरत असताना असलेल्या पदानुसार निवृत्तांची संघटना नको आहे. निवृत्तीनंतर सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची एकच रँक अशा पद्धतीने संघटना चालवली पाहिजे. शासनाने निवृत्त पोलिसांसाठी पोलिस कल्याण विभाग वेगळा करावा. त्यासाठी एखादा मंत्री नेमावा यासाठी संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत. 

यावेळी रामराव वाघ, काशिनाथ कचरे, माधवराव माळवे, सोपानराव मांगडे, प्रकाश घार्गे, मदन चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक सांगलीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी केले. ते म्हणाले, संघटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.जिल्ह्यात एक हजार सभासद करण्याचा मानस आहे. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संघटनेतील 75 वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई व अन्य जिल्ह्यातील निवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष गजानन शिंदे यांनी आभार मानले.