Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Sangli › सामूहिक बलात्कारप्रकरणी अहवाल द्या : महिला आयोग

सामूहिक बलात्कारप्रकरणी अहवाल द्या : महिला आयोग

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

तुरची फाटा (ता. तासगाव) येथे  आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकाराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.  याप्रकरणी कार्यवाहीचा अहवाल त्वरित सादर करावा, अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. 

पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की सामूहिक बलात्कारप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्याकडून कोणती कार्यवाही करण्यात आली? संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे का? याबाबतचा सविस्तर अहवाल आयोगास सादर करावा. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन  जिल्हा पोलिस अधीक्षकांनी व्यक्‍तीश: लक्ष देऊन याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, कसून तपास करावा.  केलेल्या कारवाईचा अहवाल तातडीने पाठविण्यात यावा. 

या घटनेबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनीही खेद व्यक्‍त केला आहे. याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याशी चर्चा केली. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. आरोपींना तत्काळ अटक करून खटला दाखल करावा. तो दुसर्‍या जिल्ह्यात चालवावा, अशीही  मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना स्थानिक पदाधिकारी सुनीता मोरे यांनाही डॉ. गोर्‍हे यांनी सूचना देऊन पीडित कुटुंबाची विचारपूस करण्याची सूचना दिली आहे.