Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Sangli › भाजपच्या कारभाराचा जनतेला पश्‍चाताप

भाजपच्या कारभाराचा जनतेला पश्‍चाताप

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 9:01PMसांगली : प्रतिनिधी

खोटे बोलून सत्तेवर आलेल्या भाजपने चार वर्षांत जनतेला जीएसटी, नोटाबंदीसह सर्वच पातळ्यांवर नाडण्याचा उद्योग केला. यामुळे मेक इन नव्हे तर डिस्ट्रॉय इन इंडिया या भाजपच्या कारभाराने जनतेला पश्‍चाताप करायची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला.गव्हर्मेंट कॉलनीत जनसंपर्क अभियानांर्तगत सभेत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी हेच लुटारू आता भेटवस्तूंच्या आमिषाने समोर येणार आहेत. त्यांच्यापासून सावध रहा, शहराचे वाटोळे टाळा असेे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे आदी प्रमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत विकासाचा अजेंडा राबविला. त्यातून सांगलीत 70 एमएलडी जलशुध्दिकरण प्रकल्प, मिरजेत 10 एमएलडी जलशुध्दिकरण प्रकल्प उभारून मुबलक व शुद्ध पाणी दिले. 18 उद्याने, भागनिहाय आरसीएच रुग्णालये उभारली. घरकुल योजनेच्या माध्यमातून अडीच हजाराहून अधिक लोकांना घरे दिली. शहरात 80 कोटी रुपये खर्चून रस्ते चकाचक् केले. परंतु भाजपने शहराचा विकासनिधी अडविण्याचा प्रयत्न केला. आता निवडणुकीसाठी येणार्‍या आमदार, खासदारांना ‘तुम्ही शहरात चार वर्षांत नवे काय आणले’  याचा जाब विचारा. त्यांनी काहीच न केल्याने आता निवडणुकीत ‘भेटवस्तूंची पोटली’ आणली आहे. भेटवस्तूंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला विकत घेऊ, अशी भाषा ते करीत आहेत. यांना वेळीच रोखा. कारण ही लढाई सामान्य बहुजन विरुद्ध जातीयवादी पक्ष अशी आहे. याचे भान ठेवा.

जयश्री पाटील म्हणाल्या, महापालिका क्षेत्र आणि जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु जातीय विषयवल्‍ली पेरून भाजपने शिरकाव केला आहे. उलट काँग्रेस विकासाचा पर्याय होता व आहे. त्यामुळे जनता काँग्रेसच्याच मागे आहे.यावेळी बिपीन कदम,  महेश कर्णे, अजय देशमुख, उषा पवार, उषाताई गायकवाड आदी उपस्थित होते.