Tue, Jul 23, 2019 11:36होमपेज › Sangli › ड्रेनेजची निविदा पुन्हा काढा

ड्रेनेजची निविदा पुन्हा काढा

Published On: Jun 21 2018 1:21AM | Last Updated: Jun 21 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

ड्रेनेज योजनेच्या ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे. शहरात बॅकवॉटर पसरत असून, नदीत मैलामिश्रित पाणी मिसळू लागले आहे. प्रदूषणाने किती बळी गेल्यानंतर योजना कार्यान्वित होणार, असा संताप शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने, प्रशांत मजलेकर, राजेश नाईक यांच्यासह सदस्यांनी महासभेत व्यक्‍त केला. अखेर याप्रकरणी ठेकेदार  कंपनीने आठ दिवसांत काम सुरू केले नाही, तर ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्याचा ठराव महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

माने यांनी सभेत ड्रेनेज योजनेतील बोगसगिरीचा पंचनामा केला. ते म्हणाले, पाच वर्षे झाली योजनेवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. मुदतवाढ, दरवाढीनुसार बिलांची खिरापत  सुरू आहे; पण योजना पूर्ण होत नाही. महिनाभर एचटीपी (मलनिस्सारण केंद्र) दुरुस्तीचे काम बंद आहे. त्यामुळे शहरातील मैलामिश्रित पाणी नदीत मिसळत आहे; परंतु योजनेचे काम बंद ठेवून ठेकेदार महापालिका व नागरिकांना वेठीला धरत आहे. 

दोन मीटर खोदाईचे काम करारपत्रात नमूद आहे. मात्र वाढीव बिलांसाठी 7 मीटर खोदाई करुन लूट करण्यात आली आहे. ठेकेदाराची आतापर्यंतची  बिले तपासल्यास याचा पर्दाफाश होईल.  ते म्हणाले, यापूर्वीही ठेकेदाराला विलंबासह विविध कारणांमुळे एक कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. तो  माफ करण्याचे प्रयत्न सुरू होते. आम्ही तो डाव आम्ही उधळून लावला. दरवर्षी महापालिकेला यापोटी एक कोटी रुपये दंडही भरावा लागतो. तो  माफ होणार आहे का? 

माने म्हणाले, 114 कोटींच्या मूळ योजनेपैकी 90 कोटी रुपये खर्चही झाले. पण अद्याप पंचशीलनगरात साधी कुदळही मारलेली नाही.  त्यामुळे भविष्यात ही योजना अर्धवट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेकेदाराला अंतिम नोटीस द्या, तो काम करण्यास तयार नसेल तर ठेका रद्द करा.राजेश नाईक म्हणाले, ड्रेनेज योजनेचे काम ठप्प आहे. दुसरीकडे खणभाग, नळभागासह संपूर्ण गावठाणात बॅक वॉटरने गटारगंगा घरात, रस्त्यावर पसरते आहे. याला जबाबदार कोण? तो प्रश्‍न निकाली निघणार की नाही?गटनेते किशोर जामदार म्हणाले, मिरजेत प्रशासनाने एचटीपी पूर्ण नसताना वाहिन्या कार्यान्वित केल्या आहेत. त्याचे सांडपाणी ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे रोगराई पसरत आहे. कारण पुढे हा ओढा नदीला मिळतो. त्याला जबाबदार कोण? शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे यांच्यासह काही सदस्यांनी भारतनगरपासून भारतभीम जोतिरामदादा आखाड्याकडे जाणार्‍या पाईपलाईनचे बूच काढण्याची मागणी केली. 

प्रशांत मजलेकर म्हणाले, जर संबंधित ठेकेदार काम करीत नसेल तर त्याचा ठेका रद्द करून निविदा प्रक्रियेने दुसरा ठेकेदार नेमावा. उपायुक्त सुनील पवार म्हणाले, योजनेच्या संथ कामाबद्दल यापूर्वी ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पण योजना रखडू नये यासाठी प्रशासनाने पुन्हा त्याच ठेकेदारांकडून काम करून घेण्याचा निर्णय घेतला. पण आता तो काम करण्यास तयार नसेल त त्याच्याकडून काम काढून घ्यावे लागेल. त्यासाठी शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घ्यावा. अखेर महापौर हारूण शिकलगार यांनी ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी आठ दिवस मुदतीची नोटीस देण्याचे प्रशासनाला आदेश दिले. 

योजनेच्या बिलांत 20 कोटींची बोगसगिरी

शेखर माने म्हणाले, ड्रेनेज ठेकेदाराने 2 मीटरऐवजी 7 मीटरने खोदाई करून लूट केली आहे. करारपत्रातील कलम 38 नुसार बिले आदा करण्यात आलेली नाहीत. त्यांच्या एका बिलात 62 लाखांची जादा रक्‍कम निघाली आहे. तो प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर बिल थांबविले. आतापर्यंत सांगलीतून 24, तर मिरजेतून 22 बिले आदा केली आहेत. या सर्व बिलांची फेरतपासणी केल्यास 20 कोटी रुपयांची योजनेत बोगसगिरी झाल्याचे स्पष्ट होते. प्रशासन ठेकेदारावर उदार असल्याने ही उधळपट्टी झाली.