सांगली : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचार परवानगीतील अडचणी दूर करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील यांच्याकडे केली. सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, भाजपचे मकरंद देशपांडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, राष्ट्रवादीचे सागर घोडके, उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मात्र प्रचारासाठी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांच्यात नाराजी आहे. त्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी पाटील यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, परवान्यांसाठी एक खिडकी फक्त जाहीर केली आहे. परंतु तेथे पोलिस, आरटीओ, आयकर विभागांचे अधिकारी हजर नसतात. त्यांच्यात एकसूत्रपणा नाही. प्रचार काळात विविध पध्दतींचे परवाने लादले आहेत. ते वेळेत मिळत नाहीत. यासाठी प्रचार सोडून उमेदवारांना हेलपाटे मारावे लागत आहेत. ही सुविधा चोवीस तास खुली रहावी. प्रचारासाठी जागाही निश्चित करून द्याव्यात. मतदान जागृतीसाठी प्रशासनातर्फे डिजिटल फलकाचा वापर केला जात आहे. मात्र उमेदवारांना फलकाची परवानगी दिली जात नाही. तीनचाकी सायकलचीसुद्धा प्रचारासाठी परवानगी घ्यावी लागत आहे. कमी कालावधीत सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे, आपली माहिती पोहोचवणे अवघड आहे. जाचक नियमामुळे उमेदवारांना ते अशक्य होत आहे. त्यामुळे जाचक नियम बदलावेत.