Wed, Mar 27, 2019 06:14होमपेज › Sangli › समविचारी एकत्र येऊन भाजपला गाडू

समविचारी एकत्र येऊन भाजपला गाडू

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:39PMसांगली ः प्रतिनिधी

सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊन  केंद्र आणि राज्यातील फसव्या भाजपच्या सत्तेला गाडून टाकू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री येथे  जाहीर कार्यक्रमात केली.महापालिकेच्या माळबंगला येथील अत्याधुनिक 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे  लोकार्पण श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज, गुरुवारी झाले. जयंत पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.  

जयंत पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी आघाडीबाबत  जिल्हा परिषदेप्रमाणे उशिरा सुचलेले शहाणपण नको; मात्र दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय चर्चेने स्थानिक पातळीवर होईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील,  आमदार डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवा नेते विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार, माजी आमदार सदाशिवराव पाटील, अमित पारेकर आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेत विकासाचा अजेंडा होता. पण दुर्दैवाने आज वाईट परिस्थिती आली आहे. आजची परिस्थिती पाहता जनताच भाजपला  विचारते आहे, की  कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवली सांगली माझी?  केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असूनही लोकप्रतिनिधींनी शहरासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. शहरे बकाल केली आहेत. तरीही काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचा चेहरा-मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. पाणी, ड्रेनेज, घरकुलांसह सर्व सुविधा दिल्या आहेत. काँग्रेसनेते (स्व. )डॉ. पतंगराव कदम, (स्व.) मदन पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली वचनपूर्ती केली आहे.आता  जनतेने काँग्रेसला पुन्हा  संधी द्यावी. शहराला टॉप टेनमध्ये नेऊन ठेवू. त्यासाठी जयंत पाटील आमच्यासोबतच असतील. 

महापालिकेच्या आघाडीबाबत ते म्हणाले, हा निर्णय तुम्हीच ठरवा. महाराष्ट्रात मात्र समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी जयंतराव आम्ही एकत्र आहोत. फसव्या भाजपला सत्तेवरून खाली खेचू. 

जयंत पाटील म्हणाले, शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत होते. त्यावर पूर्वी विधानसभेच्या निवडणुकाही गाजल्या. पण आता जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्याने सांगलीकरांना 25 वर्षे चिंता करण्याची गरज नाही.  सध्या दिल्लीत आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. स्थानिक आमदारांनी चार रस्ते केले असतील; पण शहराच्या मुलभूत सुविधांसाठी काहीच केलेले नाही. उलट निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे मंत्री भेटवस्तू घेऊन जनतेला आपलेसे करण्यास निघाले आहेत. दिवसाढवळ्या प्रलोभने दाखविली जात आहेत. 

ते म्हणाले, 2014 ची लाट राज्यातच नव्हे तर देशातही आता राहिलेली नाही. लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जनतेला भाजपने नाकारले आहे. त्यामुळे सन 2019मध्ये भाजप लोकसभेत 273 वरुन 180 पर्यंत खाली येईल. भंडारा-गोंदियात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली. विजय मिळाला. पालघरमध्ये पराभव झाला असला तरी भाजपविरोधी मतदान पाहिल्यावर लोकांच्या भावना किती तीव्र आहेत, ते दिसून येते. 

पाटील म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची निवडणूक पूर्व आघाडी झाली असती तर वेगळेच चित्र  समोर आले असते. त्यामुळे वेळीच शहाणे होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असा माझा आग्रह होता. पण मोहनराव कदम माझ्यावर नाराज असल्याने तेव्हा जमले नाही. 

ते म्हणाले, राज्यातील भाजपचे मंत्री धुतल्या तांदळासारखे नाहीत. 22 मंत्र्यांवर आरोप आहेत. त्यातील दोन मंत्र्यांची चौकशी सुरू आहे. ज्या प्रकरणात मुख्यमंत्र्याचा सहभाग आहे, त्या प्रकरणाची चौकशी लोकपाल करीत आहेत. वास्तविक मुख्यमंत्री हे लोकपालांच्या कक्षेत येत नाहीत. स्वत:च्या बचाव करण्याचा मुख्यमंत्र्याचा तो प्रयत्न आहे.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. आम्ही मनावर घेतले तर भाजपचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून येणार नाही. 

विश्‍वजीत कदम म्हणाले, महापालिकेचे बजेट चारशे कोटींचे असताना नगरसेवकांनी विकासाला गती देत अडीचशे कोटींची कामे मार्गी लावली. नागरिकांनी टाकलेला विश्‍वास सार्थ करीत विकासकामे पूर्ण केली. शहरात 24 कोटींचे रस्ते झाले. शहर स्वच्छ सर्व्हेक्षणच्या स्पर्धेत आले.  महापालिकेच्या  निवडणुकीत  जातीयवादी शक्तीला दूर करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून निर्णय घेऊ. यासाठी अशोक चव्हाण यांचा ‘नांदेड पॅटर्न’ या महापालिकेच्या निवडणुकीत राबवू. 

जयश्रीताई पाटील म्हणाल्या, सांगली व कुपवाडला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, हे भाऊंचे स्वप्न होते. त्यासाठी डॉ.पतंगराव कदम, प्रतिक पाटील, विश्‍वजीत कदम आदींनी प्रयत्न केले होते. सत्तर एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्प मंजूर केला आहे. मात्र वारणेचे पाणी आले असते तर खर्‍या अर्थाने मदनभाऊंचे स्वप्न पूर्ण झाले असतेे. 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, भाजप लोकप्रतिनिधींनी निधी अडवायचे काम केले. आता महापलिकेच्या निधीतून स्वत:चे नाव टाकून रस्त्यांची कामे केली जात आहेत. काँग्रेसमधील माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. हा पक्षाला सुखद धक्का आहे. ही घाण पक्षातून बाहेर पडली ते बरे झाले. राष्ट्रवादीतून देखील घाण बाहेर जाणे आवश्यक आहे. 
महापौर हारूण शिकलगार प्रास्ताविकात म्हणाले,  महापालिकेत काम करताना  अडीच वषार्ंत एक रूपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. शहराचा विकास डोळ्यांसमोर ठेवून काम केले. गटनेते किशोर जामदार यांचेही भाषण झाले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतल उपाध्ये यांनी योजनेची माहिती दिली.सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी आभार मानले. 

प्रतिक पाटील, आयुक्त अनुपस्थित

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, मनपा आयुक्त रविंद्र खेबुडकर अनुपस्थित होते. याबाबतही मान्यवरांनी टोलेबाजी केली.