Tue, Nov 13, 2018 00:23होमपेज › Sangli › प्रादेशिक नळपाणी योजना लवकरच सौर ऊर्जेवर

प्रादेशिक नळपाणी योजना लवकरच सौर ऊर्जेवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 12 प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना थकीत वीज बिलामुळे वारंवार बंद राहतात. पाणीपुरवठा बंद होतो. त्यावर पर्याय म्हणून या योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्याचा 100 गावांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, महिला व बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, अर्थ व बांधकाम सभापती अरूण राजमाने, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवि, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन निवेदन दिले. पदाधिकार्‍यांशी संवाद साधत जिल्हा परिषदेच्या सर्व मागण्या, प्रश्‍नांवर गांभिर्याने कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

अधिकार्‍यांची रिक्त पदे भरणार

जिल्हा परिषदेकडील वर्ग 1 व वर्ग 2 अधिकार्‍यांची रिक्त पदे भरली जातील. त्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. जलयुक्त शिवार अभियानात पुढील वर्षापासून आराखडा बनविताना जिल्हा परिषद स्थायी समिती सभेची मान्यता घेणे बंधनकारक करावे, अंगणवाडी बांधकामासाठी निधी मिळावा, आंतरजिल्हा बदली झालेल्या 136 शिक्षकांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हा परिषदेने अद्याप कार्यमुक्त केलेले नाही त्यासंदर्भात आदेश व्हावा व अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. दरम्यान, या निवेदनातील मागण्यांवर गांभिर्याने निर्णय होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सन 2019 पर्यंत जिल्ह्यात ग्रामीण भागात एकही बेघर राहू यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभावी उपयोग करावा, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. 

37 कोटींचा प्रकल्प 17 कोटीत

बारा प्रादेशिक नळपाणी योजना महावितरणच्या विजेऐवजी सौर उर्जेवर चालविण्यासाठी 37 कोटींच्या निधीची गरज आहे. केद्र शासनाकडील सबसिडी मिळाल्यास आणि प्रकल्पाच्या सामग्रीवरील करमाफ झाल्यास 17 कोटी रुपयांमध्ये सौर प्रकल्प राबविता येईल. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनाही सौर उर्जेवर चालविण्यासाठी 130 कोटी रुपयांची गरज आहे. दुसर्‍या टप्प्यात त्यासाठीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.