Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Sangli › जिल्हा बँकांच्या नोकरभरतीतील भानगडींना ‘ब्रेक’

जिल्हा बँकांच्या नोकरभरतीतील भानगडींना ‘ब्रेक’

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा बँकांमधील नोकरभरती पारादर्शी होण्यासाठी शासनाने भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय जारी केला आहे.  भरतीसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करावी लागणार आहे.  संचालकांच्या हाती केवळ 5 गुण ठेवले आहेत. दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांमधील नोकरभरतीतील भानगडींना ‘ब्रेक’ लागणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे. 

राज्यातील काही जिल्हा बँकांनी सहकार आयुक्त कार्यालयाकडून कर्मचारी आकृतीबंध निश्‍चित करून भरतीस मान्यता घेतली व भरती केली. मात्र भरती प्रक्रिया राबवित असताना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा व परीक्षोत्तर टप्प्यात काही बँकांच्या संदर्भात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीत भरती प्रक्रिया प्रामाणिक, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने झाली नसल्याचे निदर्शनास आले असल्याकडे लक्ष वेधत सहकार विभागाने ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. 

नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा बँकांनी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करावी. या संस्थेने किमान 5 राष्ट्रीयकृत बँका/शेड्युल्ड खासगी बँका/शासनातील विविध विभागांसाठी नोकरभरतीची ऑनलाईन प्रक्रिया राबविलेली असावी. नोकरभरतीच्या अनुषंगाने अशी संस्था काळ्या यादीत समाविष्ट केलेली अथवा प्रस्तावित नसावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे. 

नोकरभरती त्रयस्थ संस्थेची निवड  व नियुक्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने करावी. भरतीप्रक्रियेदरम्यान भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्यास भरती प्रक्रिया रद्द करणे, स्थगित करणे तसेच संबंधित संस्थेविरोधात फौजदारी कार्यवाही करण्याची जबाबदारी बँकेची राहील, असे शासन निर्णयात स्पष्ट केलेले आहे. 

ऑनलाईन परीक्षा व मुलाखातीसाठी गुणांचे 90:10 असे प्रमाण ठेवावे. मुलाखतीसाठीच्या 10 गुणांपैकी 5 गुण संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबाबत असतील व उर्वरीत 5 गुण मुलाखतीसाठी असतील. शैक्षणिक पात्रतेबाबतच्या गुणांचे विभाजन बँकेचे संचालक मंडळ ठरवेल. मुलाखतीचे पॅनेल संबंधित बँकेचेच असेल. मात्र मुलाखतीच्या पॅनेलवर असणार्‍या व्यक्तीच्या कुटुंबातील/नात्यातील कोणताही उमेदवार मुलाखतीस पात्र असल्यास संबंधित व्यक्तीने मुलाखतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ नये, असेही शासन निर्णयात म्हटले आहे. 

दरम्यान, नोकरभरतीसंदर्भात शासन निर्णयाचे पालन न केल्यास बँकेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 अन्वने कार्यवाही करावी, असे निर्देश शासन निर्णयाद्वारे सहकार आयुक्तांना दिले आहेत.