Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Sangli › भरतीच्या आमिषाने ५ जणांना गंडा

भरतीच्या आमिषाने ५ जणांना गंडा

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:53PMसांगली : प्रतिनिधी

येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात पोलिस असल्याची बतावणी करून पोलिस भरतीचे आमिष दाखवून भामट्याने पाच युवकांना एक लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी संजय विनायक कांबळे (वय 45, रा. हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) याला अटक करण्यात आली आहे. त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले  आहेत. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

याप्रकरणी सूर्यकांत लक्ष्मण कांबळे (रा. सिद्धार्थ परिसर, गावभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सूर्यकांत यांच्यासह संजय तुकाराम कांबळे (रा. कोल्हापूर रस्ता परिसर, सांगली), वृषभ सतीश चांदणे (रा. मिरज),  प्रवीण बाळू कांबळे (रा. कोल्हापूर चाळ, मिरज), योगेश अर्जुन कोळी (रा. हरिपूर रस्ता, पवार प्लॉट, सांगली) या युवकांचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

एका कामाच्या निमित्ताने सूर्यकांत यांची संजय कांबळेशी ओळख झाली होती. त्यावेळी संजयने आपण सांगलीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात पोलिस शिपाई म्हणून काम करीत असल्याचे त्यांना सांगितले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्या दोघांची पुन्हा भेट झाली. त्यावेळी जिल्ह्यात पोलिस भरती निघाली आहे. कोणी मुले भरती करायची असतील तर सांगा, साहेबांना सांगून तुमचे काम करून देतो. नेटवर भरतीची जाहिरात बघा असेही त्याने सांगितले होते. 

सूर्यकांत यांना नातेवाईकांनी सांगलीत पोलिस शिपाई पदाच्या 63 जागा भरायवच्या आहेत असे नेटवर पाहून सांगितले. त्यानंतर त्यांनी संजयशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने इच्छुक मुलांची रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबूक, दहावी, बारावीचे प्रमाणपत्र, खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, सहा फोटो अशी सर्व कागदपत्रे घेऊन या तुमचे काम करतो असे फोनवर सांगितले. 
त्यानंतर ड्रेस, नेमप्लेट, दोन जोड बूट, बॉण्ड,  वैद्यकीय प्रमाणपत्र यासाठी पाचजणांकडून 80 हजार पाचशे रूपये घेतले. त्यानंतर साहेबांनाही पैसे द्यायचे आहेत असे सांगून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे पंचवीस हजार रूपयेही घेतले. 

भरती करतो असे सांगून पाचही जणांकडून मिळून त्याने एक लाख पाच हजार रूपये घेतले. पैसे देऊन बरेच दिवस झाल्यानंतरही भरती न झाल्याने पाचही युवकांनी त्याच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यानंतर पाचही जणांना दि. 16 एप्रिल रोजी टंकलिखित केलेले पोलिस मुख्यालयात हजर व्हा असा मजकूर असलेला एक आदेश आणून दिला. परंतु त्या आदेशाची शंका आल्याने युवकांनी त्याबाबत पोलिस मुख्यालयात चौकशी केली. 

त्यानंतर यावर्षी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची पोलिस भरती झाली नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर युवकांसह त्यांच्या नातेवाईकांनी संजय कांबळेकडे पैशांसाठी तगादा लावल्यानंतर त्याने कार्पोरेशन बँकेचा एक लाख रूपयांचा धनादेश त्यांना दिला. मात्र तोही खोटा असणार असे समजून फसवणूक झालेल्या युवकांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्याकडे  फसवणुकीबाबत तक्रार केली. त्यानंतर बोराटे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. नंतर त्याला अटक करण्यात आली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.