Fri, Apr 26, 2019 17:52होमपेज › Sangli › इच्छुक उमेदवारांकडून 1 कोटी कर वसूल

इच्छुक उमेदवारांकडून 1 कोटी कर वसूल

Published On: Jul 09 2018 1:05AM | Last Updated: Jul 08 2018 11:07PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणूक थकबाकी वसुलीसाठी चांगलीच पावली आहे. इच्छुक उमेदवारांना सर्वच विभागाची थकबाकी नसल्याचे दाखले सक्‍तीचे आहे. त्यानुसार आता थकबाकी भरून दाखले घेण्यासाठी झुंबड सुरू आहे. यामुळे शनिवारअखेर सर्वच विभागाच्या थकबाकीची तब्बल 1 कोटी 5 लाख 10 हजार रुपयांची वसुली झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवस आहेत. त्यामुळे आणखी थकबाकी वसुलीची शक्यता आहे.

.महापालिकेची रणधुमाळी सुरू असून, अर्ज भरण्यासाठी आता तीन दिवस उरले आहेत. या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना अर्जासोबत घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता, टेलिफोन, आरोग्य विभागासह सहा विभागांची थकबाकी नसल्याचे दाखले आवश्यक आहेत. त्यामुळे पाच वर्षे काही नगरसेवक, इच्छुक पदांनी थकविलेला महापालिकेचा कर आता भरणे नाईलाजास्तव बंधनकारक झाले आहे. यासाठी सर्वांनी कर भरण्यासाठी गेल्या 4 तारखेपासून झुंबड लावली आहे. 

याअंतर्गत शनिवारपर्यंत घरपट्टीचे 72 लाख, पाणी पट्टीचे 26  लाख, तर मालमत्ता विभागाचे  5.70 लाख वसूल झाले आहेत. महाआघाडीच्या काळातील मोबाईल बिलानुसार 48 नगरसेवकांकडून मोठी थकबाकी होती. पाच वर्षांच्या फरकाने वसुलीची सक्‍ती केली. त्यातूनही तब्बल 1 लाख 40 हजार रुपये वसूल झाले आहेत. एकूणच महापालिका निवडणुकीच्या ना हरकत दाखल्यांतून तब्बलएक कोटी पाच लाख दहा हजार रुपयांचा गल्ला जमा झाला आहे.

मतदार याद्या अखेर उपलब्ध

महापालिका निवडणुकीचा अर्ज भरणा सुरू झाला आहे. परंतु महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदारयाद्या निश्‍चित होऊन छपाई झाल्या नव्हत्या. यामुळे इच्छुकांसह नागरिकांची गैरसोय झाली होती. यासाठी तगादा सुरू होता. अखेर शनिवारपासून महापालिका प्रशासनाने या निवडणूक कार्यालयांमध्ये अधिकार्‍यांकडे या याद्या उपलब्ध केल्या आहेत.

‘पाणीपुरवठा’त हुल्लडबाजी; गुन्हे दाखलचे आदेश

पाणीपुरवठा विभागाकडून ना हरकत दाखले घेण्यासाठी मिरजेत काही इच्छुक व समर्थकांनी ‘एकखिडकी’ विभागाकडे अर्ज दाखल केले होते. परंतु त्यामध्ये काहीजणांनी पत्ते लिहिले नव्हते. थकबाकी भरून पावत्या, शिधापत्रिका कार्डची प्रत जोडलेली नव्हती. त्यामुळे त्यांना दाखले देण्यात आले नव्हते. परंतु काहीजणांनी यासाठी हुल्लडबाजी करीत कागदपत्रे उधळून लावू, बघून घेऊ, अशा धमक्या दिल्या. हे समजताच निवडणूक अधिकारी तथा आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.