Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Sangli › रेकॉर्ड ब्रेक गुन्हेगारी, पोलिस प्रतिमेला धक्का

रेकॉर्ड ब्रेक गुन्हेगारी, पोलिस प्रतिमेला धक्का

Published On: Dec 30 2017 12:45AM | Last Updated: Dec 29 2017 8:55PM

बुकमार्क करा
किरकोळ कारणावरून सतत होणारे खुनी हल्ले आणि खून, भरदिवसा होणार्‍या घरफोड्या आणि चोर्‍यांमुळे सरत्या वर्षात नागरीक चांगलेच हैराण झाले. दुसर्‍या बाजूला गुन्हेगारीवर नियंत्रित ठेवण्याऐवजी अनिकेत कोथळे खूनप्रकरण, वारणानगर येथे 9 कोटी रुपयांवर मारलेला डल्ला आणि पोलिस उपनिरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांचा खून यामुळे सांगलीच्या पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला.  मध्यप्रदेशमधील बेकायदा शस्त्रनिर्मिती कारखान्यावर टाकलेला छापा आणि जिल्ह्यातील मटका टोळ्यांची तडीपारी या पोलिसांच्या काही चांगल्या कामगिरीच्या गोष्टी सांगता येतील. 
लूटमार, चोर्‍याने नागरीक त्रस्त

भरधाव दुचाकीवरून येऊन चेनस्नॅचिंग करणे, गाडीच्या काचा फोडून किंमती वस्तू पळवणे, दिवसा-ढवळ्या घरफोड्या करणे याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून फिरणे अवघड होऊ लागले. अखेर नागरिकांना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील यांच्याकडे तक्रार करण्याची वेळ आली. जिल्हाधिकार्‍यांनी पोलिस दलाची बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या. 
परंतु, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा आरोप फेटाळत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा केला. त्याचदिवशी त्यांची नागपूरला तडका - फडकी बदली झाली. तत्कालीन विभागीय पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची सोलापूरला बदली झाली. 
कोथळे प्रकरणामुळे राज्यभर नाचक्की
अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत खून करून आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र  जनता आणि माध्यमांमुळे पोलिसांचे कृत्य अखेर चव्हाट्यावर आले. गृहराज्यमंत्री, पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांना येथे धाव घ्यावी लागली. या प्रकरणात आरोपी असलेले पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच पोलिसांना बडतर्फ करून गजाआड करण्यात आले. त्या शिवाय त्यात आणखी 6 पोलिसांना निलंबीत करण्यात आले. मात्र यात पोलिसांची मनमानी चर्चेत आली.

वारणानगर प्रकरण; रक्षकच भक्षक

सांगलीत पोलिसांनी मोहसीन मुल्ला या युवकाकडून 3 कोटी रुपये जप्त केले. या रकमेचा तपास करत हे प्रकरण वारणानगरपर्यंत पोहोचले. पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांच्यासह सात कर्मचार्‍यांनी  तपासाच्या नावाखाली 9 कोटी 18 लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे चौकशीत पुढे आले. 

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा छडा लावण्याची ज्या विभागाची जबाबदारी होती, त्या ‘एलसीबीने’ च हा पराक्रम केल्याने पोलिस खात्याची बदनामी झाली. यातील सहाजण जेलची हवा खात आहेत, तर एक अद्याप फरार आहे. 

गुन्हेगारांना राजकीय पाठबळ चिंताजनक 

खून, खुनाचा प्रयत्न, घातपात असे गुन्हे असलेले अनेकजण राजकारणात उजळ माथ्याने फिरत आहेत. अनेकांची डिजिटलही झळकत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होताना दिसली नाही. सावंत टोळीचा सूत्रधार आणि माजी नगरसेवक सचिन सावंतला खून प्रकरणात महिनाभर पकडता आले नाही. मात्र लूटमारीच्या संशयावरून अनिकेत कोथळे याला अटक करून त्याला मारहाण करण्यात आली. त्याचा जीव गेला. हा प्रकार चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी आंबोलीत मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा  प्रयत्न झाला.  
 टोळी युध्दाचा भडका
मोडीत काढलेल्या संघटित गुन्हेगारीने गेल्या वर्षभरात पुन्हा चांगलेच डोके वर काढले.  

संजयनगर परिसरात दोन कॉलेज गु्रपमधील राड्यात एकाचा खून झाला. त्यात एका पोलिस पुत्रासह दोघे गजाआड झाले. सावंत टोळीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊन एकाचा भर दिवसा खून झाला. तर सचिन सावंतवर मोकाअंतर्गत कारवाई झाली. त्या शिवाय संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी युद्धातून दोन खून झाले. 

 अनेक खून, गुन्ह्यांचा छडाच नाही

सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक खून झाले. त्यातील काही खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. शहरासह जिल्ह्यात अनेक घरफोड्या, चोर्‍या झाल्या. रोख रक्कमेसह किंमती ऐवज लंपास झाला. काही अपवाद वगळता अनेक चोर्‍यांचा छडा पोलिसांना लावता आला नाही. 

चंदन चोरीने प्रतिमेला धक्का

पोलिस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडांची सलग दुसर्‍या वर्षी चोरी झाली.  पोलिसांचेच आवार सुरक्षित न राहिल्याने पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ठिकठिकाणी छापे घातले. यात गेल्या वर्षी चोरी केलेल्या चोरट्यांना पकडले. मात्र या वर्षी चोरी झालेले चोरटे  मात्र हाताला लागले 
नाहीत. 
मटका, जुगाराचे सूत्रधार मोकाटच

जिल्ह्यातील मटका, जुगार मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी 52 टोळ्यांवर तडीपारीची कारवाई केली.  मटके बहाद्दर आहेत, हे कळण्यासाठी या लोकांची शहरात ठिकठिकाणी डिजिटलही लावली. मात्र या मटक्याचे सूत्रधार मात्र मोकाटच राहिले. त्यामुळे मटका पूर्णपणे मोडीत निघाला नाही.