Sun, May 26, 2019 16:54होमपेज › Sangli › जिल्हा बँक अध्यक्षांविरोधात बंड; 13 संचालकांचे राजीनामे

जिल्हा बँक अध्यक्षांविरोधात बंड; 13 संचालकांचे राजीनामे

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:25AMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्याविरोधात अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील 13 संचालकांनी पक्ष नेत्यांकडे राजीनामे देऊन निर्णायक बंड पुकारले आहे. या संचालकांनी अध्यक्षपदासाठी माजी आमदार संचालक मानसिंगराव नाईक यांचे नाव पुढे केले आहे. उपाध्यक्षपदासाठी डॉ. प्रताप पाटील प्रबळ इच्छुक आहेत. जिल्हा बँकेतील संचालकांचे बंड आणि खांदेपालट याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी व भाजपची सत्ता आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील (राष्ट्रवादी) व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (भाजप) यांच्या कारकिर्दीला  दि. 20 मे 2018 रोजी तीन वर्षे झाली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलासाठी राष्ट्रवादीतील काही संचालकांनी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप व काँग्रेसचे संचालकही पदाधिकारी बदलाच्या मागणीच्या पाठीशी ठाम आहेत.

अध्यक्ष व उपाध्यक्ष बदल व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे संचालक मानसिंगराव नाईक, बी. के. पाटील, डॉ. सिकंदर जमादार, सुरेश पाटील, गणपती सगरे, बाळासाहेब होनमोरे, कमलताई पाटील यांनी त्यांचे राजीनामे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे सादर केले आहेत. काँग्रेसचे संचालक विशाल पाटील, सी. बी. पाटील, महेंद्र लाड, विक्रम सावंत यांचे राजीनामे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्याकडे, तर डॉ. प्रताप पाटील, चंद्रकांत हाकेयांचे राजीनामे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याकडे सादर झाले आहेत. 

बहिष्कारानंतर आता राजीनामास्त्र

बँकेचे अध्यक्ष पाटील हे योग्य वागणूक देत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या काही संचालकांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाल तीन वर्षे झाल्याने नवीन पदाधिकारी  निवड व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, ही मागणी दुर्लक्षित झाल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बहुसंख्य संचालकांनी बँकेच्या सभांना उपस्थित न राहणे, कामकाजात सहभाग न घेणे अशा पध्दतीने बहिष्कार सुरू ठेवला होता. 

बँकेचे कामकाज ठप्प झाल्याने जयंत पाटील यांनी संचालकांची बैठक घेतली होती.  ‘संचालकांच्या भावनांचा विचार केला जाईल. बँकेचे सभा कामकाज चालू करा, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल’, असे जयंत पाटील यांनी दि. 22 मेरोजी सांगितले होते. मात्र, त्यानंतर दोन-अडीच महिने झाले तरी पदाधिकारी बदल न झाल्याने  13 संचालकांनी राजीनामे सादर केले आहेत. 

राजीनामा न दिलेले 8 संचालक 

जिल्हा बँकेच्या 21 पैकी 13 संचालकांनी नेत्यांकडे राजीनामे दिले आहेत. राजीनामा न दिलेल्यांमध्ये  दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार अनिलराव बाबर, उदयसिंह देशमुख, श्रद्धा चरापले या पाच संचालकांचा तसेच 13 संचालकांनी ज्यांच्याकडे राजीनामे दिले आहेत, ते विलासराव शिंदे, मोहनराव कदम, संजय पाटील या तीन संचालकांचा समावेश आहे. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलासाठी बहुसंख्य संचालक आक्रमक झाले आहेत. अध्यक्षपदासाठी संचालकांमधून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव पुढे आले आहे. उपाध्यक्षपदासाठी डॉ. प्रताप पाटील  प्रबळ इच्छुक आहेत. डॉ. पाटील हे काँग्रेसच्या पॅनलमधून विजयी झाले असले तरी सध्या ते भाजपचे खासदार पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. 

अध्यक्ष  पाटील व बहुसंख्य संचालकांमध्ये विसंवाद निर्माण झालेला होता. जिल्हा बँकेकडील रखडलेली कर्मचारी भरती, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी भरतीबाबतही काहीच हालचाल होत नसल्याने काही संचालकांमध्ये नाराजी आहे.   संचालक मंडळातील मतभेद, वरिष्ठ अधिकार्‍यांमधील परस्पर कुरघोडीचे प्रकार, वसंतदादा कारखान्याचा भाडेकरार या सर्व बाबींवरून जिल्हा  बँकेतील वातावरण बिघडले आहे. जिल्हा बँकेतील बंड आणि खांदेपालटाबाबत नेतेमंडळी काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा बँक बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस : 9
काँग्रेस : 6     
भाजप : 5
शिवसेना : 1

(बँकेत काँग्रेस विरोधी बाकावर आहे. ‘जयंत पाटील-मदन पाटील-संजय पाटील’ पॅनेलमधून डॉ. सिकंदर जमादार (काँग्रेस)निवडून आले आहेत. त्यांनी शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे).  

जयंत पाटील यांच्याबरोबर शुक्रवारी बैठक : शिंदे

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेतील राष्ट्रवादीच्या संचालकांच्या राजीनाम्यांचा लखोटा आला आहे. राजीनाम्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबरोबर दि. 24 किंवा 25 रोजी बैठक होईल. राजीनामा दिलेलेे संचालक उपस्थित असतील.

राजीनाम्याचा लखोटा आला आहे : मोहनराव कदम

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बँकेचे ज्येष्ठ संचालक मोहनराव कदम म्हणाले,  बँकेतील काँग्रेस संचालकांच्या राजीनाम्याचा लखोटा बुधवारी सकाळी आला आहे. मात्र, अद्याप  तो उघडून पाहिलेला नाही. त्यामुळे राजीनाम्याचे काय कारण दिलेले आहे हे माहीत नाही. राजीनामा प्रकारासंदर्भात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे.