Sun, Jan 19, 2020 22:47होमपेज › Sangli › सांगलीत तलवार, कोयता जप्त

सांगलीत तलवार, कोयता जप्त

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 11:29PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्त्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी खत्रीने साथीदारांसह तलवारीने एकावर हल्ला केला. मात्र पोलिस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, यातील जखमी पळून गेल्याने पोलिसांना हल्ल्याबाबत कारवाई करता आली नाही. दरम्यान खत्रीसह चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक धारदार तलवार आणि कोयता जप्त करण्यात आला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

रवी रमेश खत्री (वय 29, रा. सावंत प्लॉट), सोमनाथ दादासाहेब डवरी (वय 29, रा. झुलेलाल चौक), धनंजय ज्ञानेश्‍वर भांडवले (वय 28, रा. सिव्हिल हॉस्पिटलजवळ), प्रशांत शिवाजी पाटील (वय 28, रा. सांगलीवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. 

रविवारी रात्री आठच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील एका हॉटेलजवळ असलेल्या पानपट्टीत खत्री आणि त्याचे साथीदार थांबले होते. दहशत माजविण्याच्या उद्देशानेच ते तेथे आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यावेळी त्यांची एकाशी किरकोळ कारणावरून वादावादी झाली.  या चौघांनीही त्या तरूणावर तलवारीने वार केले. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक तातडीने घटनास्थळी आले. 

पोलिस आल्यानंतर जखमीसह त्याचे साथीदार पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी खत्रीसह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक धारदार तलवार आणि कोयता सापडला. याप्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आली आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी चौघांवरही विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पळून गेलेला जखमी सापडला नसल्याने पोलिसांना कारवाई करणे अशक्य झाले आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. खाडे, निलेश कदम, अशोक डगळे, सचिन कनप, सुधीर गोरे यांनी कारवाई केली.