Tue, Mar 26, 2019 21:57होमपेज › Sangli › दरात घसरण; द्राक्ष उत्पादक संकटात

दरात घसरण; द्राक्ष उत्पादक संकटात

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 8:25PMसांगली : विवेक दाभोळे  

ऐन हंगामात द्राक्षांवर घसरत्या दराची कुर्‍हाड कोसळली आहे. दरात झपाट्याने झालेल्या घसरणीमुळे द्राक्ष उत्पादक उपाशी अन् खरेदीदार व्यापारी, दलाल मात्र तुपाशी अशी स्थिती द्राक्ष उत्पादकांना अभुवण्यास येत आहे. तर दरातील घसरगुंडीमुळे चांगल्या प्रतिची निर्यातक्षम द्राक्षे कवडीमोल दराने स्थानिक बाजारात विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.

द्राक्षपट्टयाच्या सीमेवर असलेल्या सोनी, करोली भागात गेल्या काही वर्षांपासून द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे. सोनी या एकाच गावात द्राक्षबागेचे एकूण क्षेत्र तब्बल 800 एकरांच्या घरात पोहोचले आहे. बाजारपेठेत या भागातील, खास करुन सोनीच्या द्राक्षांना नाशिकच्या द्राक्षांच्या जोडीने  मागणी आहे. द्राक्षांच्या उत्तम प्रतिसाठी येथील वातावरण अत्यंत अनुकूल असे आहे. मात्र दुष्काळ परिस्थिती ही येथील शेतकर्‍यांसाठी कायमची असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी सोनी गावातील  काही शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आणि वर्गणी काढून म्हैसाळ योजनेच्या हरोली येथील पाटातून तब्बल 20 ते 25 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनने पाणी आणले आहे. यासाठी लाखोंचा खर्च केला आहे. याचा देखभाल दुरूस्तीचा खर्च देखील मोठा आहे.

हे सारे व्याप करुनदेखील आज भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दर अस्थिरतेच्या दुष्टचक्रात अडकला आहे. शेतकर्‍यांनी मोठा  खर्च आणि काबाडकष्ट करुन पिकवलेल्या उत्तम प्रतिच्या द्राक्षांना व्यापारी वर्गाकडून योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या हंगामात याच दिवसात सोनाक्का या जातीच्या द्राक्षांना 350 ते 400 रुपये भाव होता. पण या वर्षी त्याच प्रतिच्या मालाला व्यापारी 140 ते 160 रुपये भाव देत आहेत.त्याचबरोबर जंबो या जातीच्या मालाला गेल्या वर्षी 320 ते 350 रुपये भाव मिळत होता पण या वर्षी त्याच प्रतिच्या मालाला 140 ते 170 भाव व्यापारी देत आहेत. या दराच्या तफावतीमुळे द्राक्षउत्पादक अडचणीत सापडले आहेत. दरातील या मोठ्या प्रमाणातील घसरणीमुळे  शेतकर्‍यांना  मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

आता  उन्हाळा वाढू लागला आहे. द्राक्षबागा जगविण्यासाठी काही ठिकाणी पाण्यासाठी खर्च करावा लागतो आहे. बागांना लागणार्‍या महागड्या औषधांचा खर्च ही वाढताच राहिला आहे.  या सार्‍या स्थितीत द्राक्षांना हमीभाव मिळावा, अशी मागणी जोर धरू  लागली आहे.