Wed, Nov 21, 2018 21:29होमपेज › Sangli › उगार खुर्दच्या एकास ५ वर्षांची शिक्षा

उगार खुर्दच्या एकास ५ वर्षांची शिक्षा

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:18AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

मिरजेतील वसंत बंधारा येथे एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी उगार खुर्द (जि. बेळगाव) येथील एकास पाच वषार्ंची सक्तमजुरी व पन्नास हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी सोमवारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. 

शाहनूर हाजीसाब शेख (वय 40) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 19 ऑक्टोबर 2016 रोजी पीडित महिला मिरजेतील वसंत बंधारा येथे कपडे धुण्यासाठी गेली होती. ती एकटीच असल्याचे पाहून शाहनूर तिच्याजवळ गेला.  तो अश्‍लील शब्दात तिला बोलू लागला. त्यावर पीडित महिला  रागावल्यानंतर त्याने तिचा गळा पकडून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. 

त्यावेळी पीडित महिला आरडा-ओरडा करून बचावासाठी हाका मारत होती. त्याचवेळी तेथून मोटारसायकलवरून जाणारे थांबले. त्यांनी महिलेला शाहनूरच्या तावडीतून सोडविले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती. 

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडित महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी, तपासी पोलिस अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या साक्षी, पुराव्याच्या आधारे न्या. काकतकर यांनी शाहनूरला पाच वर्षांची सक्तमजुरी, पन्नास हजार रूपये दंड व तो न दिल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. 

दंडाची रक्कम पीडितेला

दरम्यान शाहनूर शेखला पन्नास हजारांच्या दंड न्यायालायाने सुनावली आहे. त्यातील पंचवीस हजार रूपये पीडित महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.