Wed, Apr 24, 2019 20:18होमपेज › Sangli › गुंड रवि खत्रीसह टोळीवर मोक्का

गुंड रवि खत्रीसह टोळीवर मोक्का

Published On: Feb 04 2018 1:56AM | Last Updated: Feb 03 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल वुडलँडजवळ दि. 1 जानेवारीरोजी मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून गुंड रमेश कोळीचा खून करण्यात आला. यातील मुख्य संशयित गुंड रमेश खत्रीसह चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला नांगरे-पाटील यांनी शनिवारी परवानगी दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.  

रवि रमेश खत्री (वय 29, रा. सावंत प्लॉट, सांगली), जावेद जहांगीर जमादार (वय 32, रा. फौजदार गल्ली, सांगली), सोमनाथ दादासाहेब डवरी (वय 29, रा. बसस्थानकामागे, सांगली), अमीर उर्फ मिस्त्री मन्सूर नदाफ (वय 30, रा. शांतीनगर, सांगली) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

रमेश कोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास तो साथीदारांसमवेत हॉटेल वुडलँड येथे दारू पिण्यासाठी गेला होता. तेथून साडेबाराच्या सुमारास तो बाहेर पडला. त्यावेळी हॉटेलच्या बाजूच्या रस्त्याने रवि खत्री त्याच्या साथीदारांसमवेत जात होता. त्यावेळी त्यांच्यात एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून बाचाबाची सुरू झाली. त्याचे रूपांतर वादात झाले.

त्यानंतर खत्रीसह त्याच्या साथीदारांनी रमेशला ढकलून खाली पाडले. तो खाली पडल्यानंतर चौघांनीही त्याचे डोके दगडाने ठेचले. तो मृत झाल्याची खात्री होईपर्यंत चौघेही त्याला दगडाने ठेचत होते. याप्रकरणी अवघ्या दोन तासांत रक्ताळलेल्या कपड्यांसह चौघांनाही मिरजेतून अटक करण्यात आली होती.  

रमेश कोळीचा खून करण्यापूर्वी रवि खत्रीने 26 डिसेंबररोजी शिक्षक सुनील आंबी यांना शास्त्री चौक परिसरात बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंबी यांचा 4 जानेवारीरोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यांच्या खूनप्रकरणीही रवि खत्रीला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याच्यासह त्याचे तीनही साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. 

रमेश कोळीच्या खूनप्रकरणी रवि खत्रीसह टोळीला अटक केल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला शनिवारी मंजुरी देण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक जीवन राजगुरू, विशाल भिसे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.