Fri, Jul 19, 2019 17:54होमपेज › Sangli › आघाडीचा फेरा पुन्हा सांगलीकडे

आघाडीचा फेरा पुन्हा सांगलीकडे

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत नागपुरात दोन्ही प्रदेशाध्यक्षांची गुरुवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाचा तोडगा होऊ शकला नाही. यामुळे पुन्हा स्थानिक पातळीवर प्रभागनिहाय जागा वाटपाची चर्चा करून अहवाल द्यावा, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. यामुळे आघाडीचा चर्चेचा फेरा सांगलीकडे आला आहे. या बैठकीला आ. डॉ. विश्‍वजित कदम, आ. सतेज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

दोन्ही प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या पार्लमेंटची बैठक पार पडली. याबाबत पृथ्वीराज पाटील म्हणाले, आम्ही काँग्रेसच्या सर्वच 78 जागांच्या बाबत इच्छुकांच्या अहवाल बोर्डकडे सादर केला. त्यानुसार काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक जास्त आहेत. काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्यामुळे जागा वाटप करताना त्याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही प्रदेशाध्यक्षकांची बैठक पार पडली. या बैठकीत अशोक चव्हाण व जयंत पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या तुल्यबळ ताकदीचा आढावा घेतला. परंतु जागा वाटपाबाबत  स्थानिक पातळीवर चर्चा अपूर्ण राहिली आहे, असे आम्ही सांगितले. यामुळे पुन्हा स्थानिकपातळीवर चर्चेचा निर्णय ढकलण्यात आला. 

35 जागा तरच आघाडी; राष्ट्रवादीचा पवित्रा

काँग्रेसने 50 जागांसाठी आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीला केवळ 28 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्याला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही तीव्र विरोध दर्शविला आहे.  काँग्रेसने राष्ट्रवादीला 35 जागा दिल्यातर आघाडी करू, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आघाडीची बिघाडी होण्याची चिन्हे झाली आहे.भाजपला रोखण्यासाठी देशात, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात दोन्ही पक्ष, जनता दल ( धर्मनिरपेक्ष) तसेच अन्य समविचारी पुरोगामी संघटनांची आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या शहर जिल्हाध्यक्षांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाली. यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला 43 जागांचा प्रस्ताव दिला, तर काँग्रेसने राष्ट्रवादीला 20 जागांची ऑफर दिली. त्यानंतर पुन्हा चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे.

दरम्यान, दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे.  दोन्ही पक्षांनी प्रभागवार 78 जागांसाठी त्यांच्या मुलाखतीही घेतल्या. तरीही मतविभागणी होऊन भाजपला संधी मिळू नये यासाठी आघाडी व्हावीच,  असा सूर दोन्ही पक्षांचे नेते आणि प्रस्थापित पदाधिकारी  आजही व्यक्‍त करीत आहेत. मात्र दोन्ही पक्षांकडील असंख्य नवीन इच्छुक आघाडीच्या शक्यतेने धास्तावले आहेत.नागपुरात काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डासमोर बुधवारी स्थानिक नेत्यांनी किमान 50 पेक्षा कमी जागा न घेण्याची भूमिका जाहीर केली.  याचा अर्थ उर्वरित 28 जागा राष्ट्रवादीला देण्याची तयारी दर्शविली आहे. 

सध्या राष्ट्रवादीचे एकूण 27 नगरसेवक आहेत. शिवाय अन्य तुल्यबळ ‘विनिंग मेरिट’चे उमेदवार आहेत. त्यामुळे केवळ एक जागा वाढवून मिळणार असेल तर आघाडी कशासाठी करायची? आघाडी करून तुल्यबळ उमेदवारांना नाराज का करायचे, असा सूर आता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास राष्टवादीचेच नुकसान होईल. भाजपला आयते उमेदवार मिळतील, अशी भीती राष्टवादीच्या स्थानिक नेत्यांनी जयंत पाटील यांच्याकडे व्यक्‍त केली आहे.  काँग्रेस अडवण्याची भूमिका घेत असेल तर थेट स्वबळावर लढू, अशीही त्यांनी मागणी केली आहे. परंतु आता दोन्ही पक्षांनी आघाडीबाबतचा चेंडू प्रदेशाध्यक्षांकडे टोलाविला होता, परंतु नागपुरात ही बैठक निष्फळ ठरली. आता पुन्हा दोन दिवसात सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी स्थानिक नेत्यांत आघाडीबाबत चर्चेचे गुर्‍हाळ होईल. त्या निर्णयावर शनिवार, रविवारी निवणडुकीबाबत हालचाली गतिमान होतील.

तीन प्रभागांत पेच कायम?

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागवाटपाचा पेच सुटला, त्यानुसार आघाडी झाली तरी काही प्रभागांत उमेदवारीवर तोडगा काढण्यासाठी खल रंगणार आहे. यामध्ये सांगलीवाडीत काँग्रेसचे विद्यमान दिलीप पाटील की राष्ट्रवादीतून हरिदास पाटील यांना संधी द्यायची? मिरजेत माजी महापौर इद्रिस नायकवडी की गटनेते किशोर जामदार पुत्र करण जामदार? कुपवाडमध्ये काँग्रेसचे प्रशांत पाटील की राष्ट्रवादीचे धनपाल खोत? या जागांवर दोन्हीकडून तडजोडीस कोणी तयार नाहीत. काय तोडगा काढायचा, याचा दोन्ही प्रदेशाध्यक्षांसमोर प्रश्‍न आहे. त्यामुळे तेथे प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे.