Mon, May 20, 2019 22:04होमपेज › Sangli › सांगली : ‘पद्मावती’ विरोधात रॅली; भन्साळींच्या पुतळ्याचे दहन

सांगली : ‘पद्मावती’ विरोधात रॅली; भन्साळींच्या पुतळ्याचे दहन

Published On: Dec 02 2017 3:07PM | Last Updated: Dec 02 2017 3:19PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

वादग्रस्त पद्मावती चित्रपटाला विरोध दर्शवन्यासाठी सांगलीत आज शिवप्रतिष्ठानतर्फे दुचाकीवरून रॅली काढण्यात आली.  चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. जिल्ह्यात हा चित्रपट प्रसिद्ध होऊ नये, या मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी विजयकुमार-काळम पाटील यांना देण्यात आले. त्यातूनही चित्रपट प्रसिद्ध झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या रॅलीस सुरूवात झाली.महापालिका - स्टेशन चौक- पुष्पराज चौक- विश्रामबाग या मार्गावरून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. तेथे जिल्हाधिकारी काळम- पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की, ‘या चित्रपटाविषयी समाजात अस्वस्थता आणि वादंग माजलेला आहे. समाजासमोर अत्यंत चुकीचा इतिहास  समोर ठेऊन सामाजीक सलोखा बिघवडण्याचे काम करणारा हा चित्रपट आहे. हिंदुस्थानावर आक्रमण करणार्‍या परकीय शक्तीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. निव्वळ चित्रपटाच्या चलतीसाठी इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट  बनवण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रसारीत करू नये. तसे झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’

निवेदन स्वीकारल्यानंतर पाटील यांनी मी तुमच्या भावना सरकारला  कळवतो, असे आश्‍वासन दिले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, नितीन चौगुले, मोहनसिंग रजपूत, सचिन पवार, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.