Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Sangli › खासदार राजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट

खासदार राजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट

Published On: Feb 18 2018 2:02AM | Last Updated: Feb 18 2018 12:17AMइस्लामपूर : प्रतिनिधी

आमदार जयंत पाटील यांचे समर्थक आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी राजारामबापू दूध संघास अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

ना. सदाभाऊ खोत व खासदार शेट्टी यांच्यातील मतभेदांच्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू दूध संघात शेट्टी यांनी दिलेली भेट तालुक्यातील आगामी राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. 

अलीकडे जयंत पाटील यांनी  मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर  टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर नगराध्यक्ष पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक शहाजीबापू पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. 

अशा घडामोडींनी राजकीय वातावरण तापले आहे. अशा वेळीराजू शेट्टी यांची राजारामबापू दूध संघास भेट आगामी राजकीय बदलाचे संकेत दाखविणारी आहे. ना.  खोत, नगराध्यक्ष पाटील यांच्या राजकीय वाटचालीला  राजू शेट्टी यांच्याशी जवळीक करून  शह देण्याचाच हा प्रयत्न म्हणावा लागेल. 

दरम्यान दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, खा. शेट्टी यांची दूध संघाला भेट ही  दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबद्दल चर्चा करण्यासाठी होती. गाईच्या दुधाचा दर प्रतिलिटर 27 रुपयांच्या खाली परवडणारा नाही. म्हणून तो वाढविण्यासाठी शासनाकडून अनुदान  मिळावे. यादृष्टीने  शेट्टी यांच्याशी चर्चा झाली. 

काँगे्रस-राष्ट्रवादीचे आमदार, खा. शेट्टी व दूध संघाचे प्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारपुढे दूध उत्पादकांचे प्रश्‍न मांडण्यांच्या अनुषंगाने चर्चा झाली. या भेटीमागे कोणताही राजकीय संदर्भ नाही असेही स्पष्टीकरण पाटील यांनी केले.