होमपेज › Sangli › अपक्षांच्या पाठीशी खासदार राजू शेट्टी

अपक्षांच्या पाठीशी खासदार राजू शेट्टी

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने निष्ठावंतांना डावलून गुंड, अवैध व्यावसायिक व धनिकांना उमेदवारी दिल्याचा आरोप करीत नाराज अपक्षांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे.अपक्षांच्या या आघाडीस खासदार राजू शेट्टी यांनी पाठबळ जाहीर केले आहे. त्यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 15) खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत अपक्षांचा मेळावा होणार आहे.

नगरसेवक राजेश नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांच्या पुढाकाराने ही मोर्चेबांधणी सुरू आहे. यासंदर्भात सोमवारी बैठक पार पडली. यामध्ये  45 हून अधिक अपक्ष उमेदवार या बैठकीस हजर होते. सामान्यांची ताकद दाखवत प्रामाणिक  कार्यकर्त्यांवर अन्याय करणार्‍या पक्षांना अपक्षांचे पॅनेल उभे करून अद्दल घडवू, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी गुंठेवारी चळवळ समितीचे चंदन चव्हाण, नगरसेविका शेवंता वाघमारे, अल्ताफ पेंढारी, अभय मगदूम, जॉज पिंटो, अंकुश जाधव, अशोक माने यांच्यासह चाळीसपेक्षा अधिक नाराज उमेदवार उपस्थित होते.

नाईक म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.  महेश खराडे म्हणाले, निवडणुकीत निष्ठावंतांना डावल्याने पक्षविरोधी वातावरण तयार झाले आहे. वेळप्रसंगी अपक्ष पॅनेलच्या प्रचारासाठी स्वाभिमानीचे नेते खा. शेट्टी यांना सांगलीत बोलवू. ठिकठिकाणी सभा घेऊ.बैठकीत सर्वांनी प्रभाग 9, 10, 11, 12, 14, 17 व 19 मध्ये अपक्षांचे पॅनेल उभे  निर्णय घेतला. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे यासाठी शुक्रवारी निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चिन्हांचे वाटप झाल्यानंतर अपक्ष पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ गणपती मंदिरापासून करण्याचा निर्णय झाला. 

प्रभाग 10 मध्ये अवैध व्यावसायिकांना उमेदवारीचा आरोप

प्रभाग दहामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपने एकाच गल्लीतील उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये अनेक अवैध धंदेवाले आहेत. सर्वसामान्य व निष्ठावंतांचा विचार न करता उमेदवारीचे वाटप झाले आहे. यांच्या विरोधात आता अपक्षांचे सर्वपक्षीय पॅनेल तयार करून जनतेची ताकद दाखवून देण्याचा निर्णय या प्रभागातील सर्व अपक्षांनी घेतला आहे, असे सांगण्यात आले. यावेळी अशोक शेठ, अशोक माने, विलास बेले, अभिजित मिरासदार, शेवंता वाघमारे, अशोक मासाळे, माधुरी कलगुटगी आदी उपस्थित होते.