होमपेज › Sangli › राजारामबापू दूध संघास ‘क्वॉलिटी मार्क’

राजारामबापू दूध संघास ‘क्वॉलिटी मार्क’

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:31PMइस्लामपूर : वार्ताहर

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)कडून देण्यात येणारे ‘क्वॉलिटी मार्क’ हे अ‍ॅवॉर्ड महाराष्ट्रात  प्रथमच राजारामबापू दूध संघास मिळाले आहे. ही  माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. या अ‍ॅवॉर्डमुळे संघाचे दूध उत्तम प्रतीचे आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही ते म्हणाले. 

पाटील म्हणाले, संकलनापासून ते ग्राहकापर्यंत दूध पोहोचेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या तपासण्या एनडीडीबीकडून (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) केल्या जातात. त्यामध्ये दुधाचे उत्पादन, संकलन, त्यावर प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थांची विक्री अशा प्रत्येक स्तरावर तपासणी होत. अन्नपदार्थ सुरक्षेच्यादृष्टीने घेत असलेली दक्षता, स्वच्छ दूध निर्मिती याच्या निकषांची पडताळणी व परीक्षा घेतली जाते. दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्यादृष्टीने सुरक्षित, चांगल्या गुणवत्तेची असल्याची खात्री झाल्यानंतर व कायदेशीर बाबींची तपासणी केल्यानंतरच हा क्वॉलिटी मार्क दिला जातो. यापूर्वी दूध संघास देशात एक्सलंट डेअरी अ‍ॅवॉर्डही मिळाला आहे. त्यानंतर दूध संघाला क्वॉलिटी मार्क प्रमाणपत्र हा दुसरा सन्मान मिळाला आहे. 

या अ‍ॅवॉर्डमुळे दूध संघाचे दूध भेसळमुक्त असल्याचा निर्वाळा मिळाला आहे. या अ‍ॅवॉर्डचे एनडीडीबीने काही नियम घालून दिले आहेत. त्यामुळे वर्षातून दोनवेळा दूध संघाचे ऑडीट होणार आहे, असेही पाटील म्हणाले. कार्यकारी संचालक सुरेश पटेल व संचालक उपस्थित होते.

शेतकर्‍यांना  थेट अनुदान द्या...

खासदार राजू शेट्टी यांच्या दूध दर आंदोलनाला पाठिंबा देण्याचा अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगून पाटील म्हणाले, राज्य सरकारने दूध भुकटीवर व दुधाला दिलेल्या अनुदानाचा शेतकर्‍यांना थेट लाभ होणार नाही. त्यापेक्षा कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 5 रुपयेप्रमाणे थेट अनुदान देण्याची गरज आहे.