Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Sangli › चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम

चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 11:25PMसांगली : प्रतिनिधी 

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी  धरणातून  पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला आहे. शनिवारी सकाळी  10 हजार 616   क्युसेक  प्रति सेंकद  पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. तर शित्तूर -आरळा पूल दुसर्‍यांदा  पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी आरळा येथील आठवडा बाजारासाठी लोकांना  पुराच्या पाण्यातून  ये- जा करावी लागली.

दरम्यान, पावसाचा जोर वाढतच  असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची  आवक होत आहे. पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी  सकाळी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.  नदी काठावरील शेकडो एकरांमधील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शुक्रवारी  9500  क्युसेक्स विसर्ग वारणा नदीत सुरू होता. पण पावसाचा जोर वाढला. त्यामुळे पाणीसाठा नियंत्रित ठेवून जेवढी आवक होत आहे, तेवढा विसर्ग वारणा नदीत सुरू केला आहे. 

शित्तूर, शिराळे वारूण,  ढवळेवाडी, उदगिरी येथील ग्रामस्थ  पाणी वाहत असलेल्या  पुलावरून  ये - जा करीत होते.गेल्या 24 तासात 28 मिलीमीटर पाऊस झाला.एकूण  2410 मिलीमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. शनिवारी दिवसभर  संततधार सुरूच होती. पावसाचा  जोर वाढला तर पुन्हा धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला  आहे. 

जिल्ह्यात तुरळक पाऊस       

जिल्ह्यात शुक्रवारपासून दिवसभरात सरासरी 1.5 मि.मी. इतका पाऊस झाला. शनिवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊस तालुकानिहाय  असा ः मिरज 4, वाळवा-इस्लामपूर 1.3, तासगाव8, शिराळा 11.2, कवठेमहांकाळ 0.2, पलूस 0.5 व कडेगाव  तालुक्यात 0.8 मि.मी. 

पुलाच्या पातळीत वाढ

विविध पुलांच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी (कंसात इशारा पातळी) फुटांमध्ये अशी ः कृष्णा  पूल  कराड 18.4  (45),  आयर्विन  पूल सांगली 22 (40), अंकली पूल हरिपूर 23 (45.11).