होमपेज › Sangli › वादळी वार्‍यासह पाऊस

वादळी वार्‍यासह पाऊस

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:48AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जत, आटपाडी या दुष्काळी भागात, तसेच वाळवा तालुक्यात शनिवारी वादळी वार्‍यांसह गारपीट झाली. सांगली, मिरज, कवठेमहांकाळ येथे वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड झाली. आटपाडी तालुक्यात नेलकरंजी परिसरातील इरकरवस्ती येथे येथे वीज पडून सुनीता सुभाष इरकर (वय 31)  या महिलेचा मृत्यू झाला. तर अशोक शिवाजी मेटकरी 
(वय 50) हे बेशुद्ध पडले. यावेळी तीन शेळ्या व सहा मेंढ्याही दगावल्या. गारपिटीने द्राक्षे व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. सांगली व मिरज शहरासह ग्रामीण भागात जोरदार वादळामुळे नुकसान झाले. 

तालुक्यात आज सायंकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.  तालुक्यातील खरसुंडी, नेलकरंजी  भागात गारपीट झाली.  नेलकरंजी जवळील इरकरवस्ती येथे वीज पडून सुनिता इरकर या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असलेले अशोक मेटकरी हे विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडले. तसेच  तीन शेळ्या व सहा मेंढ्यांही मरण पावल्या. आटपाडी, विठलापूर, कौठुळी, दिघंची, राजेवाडी,लिंगीवरे या भागात पावसाने हजेरी लावली.  सायंकाळी जोरदार वादळी वारे वाहू लागले. या वार्‍यांमुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्या.आटपाडी येथील आठवडा बाजाराची वार्‍याने आणि पावसाने दाणादाण उडाली. बाजारात उन्हाच्या झळापासून वाचण्यासाठी लावलेले प्लास्टिक कागद उडून गेले. भाजीपाला विक्रेत्यांचे ही किरकोळ नुकसान झाले.

वाळवा तालुक्यात गारपीट; द्राक्षे, आंबा पिकांचे नुकसान

इस्लामपूर : शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात शनिवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात गारांचा सडा पडला होता. वादळी वार्‍याने शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.  

आज सकाळपासून जोरदार उष्मा जाणवत होता. दुपारपासून वातावरणात बदल होत होता. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले. अधूनमधून विजांचा कडकडाट होत होता.  वळवाच्या पावसाने गारांसह जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळित झाले. 

बोरगाव, नेर्ले, कासेगाव, वारणा पट्ट्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली. ऊस हंगाम अजूनही सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांच्या ऊस तोडी सुरू आहेत. अनेकांचा ऊस उभा आहे.   खरीप पेरणीपूर्व मशागतीला हा पाऊस पोषक असला तरी ऊस तोडणीला मारक ठरणार आहे. या गारांच्या पावसाने मागास गहू, हरभरा, द्राक्षे, आंब्यांना फटका बसणार आहे.

जत तालुक्यात पाऊस, गारपीट

जत/येळवी : जत शहरासह परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. संख, पांडोझरी, खंडनाळ या भागात गारपीट झाली तर कुंभारी, कोसारी, शेगाव, बागेवाडी, रेवनाळ या  भागात  तुरळक सरी पडल्या. वादळी वार्‍यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. येळवी, टोणेवाडी, निगडी खुर्द, आवंढी येथे सायंकाळी वादळी वारे व तुरळक पाऊस झाला. पाऊस झाला. येळवी  आठवडा बाजार असल्याने भाजीविक्रेत्यांची धांदल उडाली.

वारणा पट्यात वादळी वारे

कवठेपिरान : कवठेपिरान, दुधगाव सावळवाडी, समडोळी, माळवाडी या वारणा पट्यातील गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी वादळी  वार्‍याने धुमाकूळ झाला.  सगळीकडे धूळच धूळ दिसत होती.  धुळीमुळे काही वाहनधारकांना गाडी चालवता आली नाही. ते वादळ थांबेपर्यंत रस्त्याकडेला गाडी उभी करून थांबले होते. 

 

Tags : sangli, sangli news, windy wind, Rain,