Thu, Jun 20, 2019 02:12होमपेज › Sangli › येळावी, आमणापूर, धनगावला  गारपिटीने  झोडपले 

येळावी, आमणापूर, धनगावला  गारपिटीने  झोडपले 

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 11:47PMसांगली/तासगाव : प्रतिनिधी

पलूस व तासगाव तालुक्यातील काही गावांना मंगळवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस आणि तुफानी गारपिटीने झोडपून काढले. यामुळे ऊस, द्राक्षबागा, केळी, सोयाबीन व भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घर, गोठ्यांवरील पत्रे उडून गेले आहेत. महावितरणचे खांब कोसळले आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

पलूस  व तासगाव तालुक्यात गेली अनेक दिवस उष्मा प्रचंड वाढला  होता. पण पावसाने हुलकावणी दिल्याने लोक उकाड्याने हैराण  झाले होते. तसेच विजेचा खेळखंडोबा व उन्हाच्या तडाख्याने पिके होरपळत होती. परंतु मंगळवारी रात्री साडेसातच्या  वाजण्याच्या सुमारास या परिसरात वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. येळावी, बांबवडे, सांडगेवाडी, निमणी, जुळेवाडी, धनगाव, आमणापूर, अनुगडेवाडी, विठ्ठलवाडी, बोरजाईनगर, अंकलखोप यासह अन्य गावांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

सलग दोन तास सुटलेल्या वादळी वार्‍यामुळे येळावी येथील महावितरणचे 13 खांब उखडून पडले आहेत. यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. येळावी गावाला रात्र  अंधारात काढावी लागली. गुरुवारी दिवसभर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी येळावीत तळ ठोकून खांब उभे करण्याचे काम करीत होते.

वादळी वार्‍याचा तडाखा पत्र्याच्या आणि कौलारू घरांनाही बसला. येळावी येथील 8  ते 10 घरांवरील पत्र्यांचे छत उडून गेले. संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मंडल अधिकारी शशिकांत ओंबासे,  तलाठी रमेश पवार यांनी घरांच्या नुकसानीचे पंचनामे केले.

वादळी  वार्‍यासह झालेल्या गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना बसला. गावातील सुमारे 80 ते 90 हेक्टरवरील द्राक्षबागेच्या तयार  झालेल्या काडीला गारांचा मारा बसला आहे. यामुळे  द्राक्षे येण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे, संचालक हणमंतराव चव्हाण, मारुतीराव चव्हाण, मंडल कृषी अधिकारी आर. आर. खरमाटे, कृषी सहाय्यक सी. के. पाटील यांनी गुरुवारी नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.

पलूस तालुक्यातील आमणापूर, धनगाव, अनुगडेवाडी, भुवनेश्‍वरवाडी  या गावांत वादळी  वारा आणि विजांच्या लखलखाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात पाणी साचून राहिले. अनेक ठिकाणी आडसाली उसाचे मोठे   फड  भुईसपाट  झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब पडले आहेत. धनगाव, आमणापूर परिसरातील  खंडीत झालेला वीज पुरवठा गुरुवार सायंकाळपर्यंत सुरु झाला नाही. महावितरणकडून दुरुस्ती काम सुरू आहे.  

परिसरातील ऊस, केळी व आगाप सोयाबीनचे पिकाची पाने फाटली आहेत. याचा वाढीवर मोठा परिणाम होणार आहे.  अमणापूर परिसरातील अनेक छपरांचे पत्रे उडाले आहेत. येथील  शेतकरी  हणमंत सुबराव पाटील यांच्या घरावरील 35 फूट लांबीचे  पत्र्याचे छत उडून गेले. यात त्यांचे सुमारे 70 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साधने आणि संसारोपयोगी वस्तूही भिजून खराब झाल्या आहेत.

सोनी  ः वार्ताहर 

मिरज तालुक्यातील सोनी परिसराला  वादळी पाऊस व गारपिटीचा शंभर एकरांपेक्षा अधिक द्राक्षबागेला फटका बसला आहे. गारपिटीची तीव्रता इतकी मोठी  होती की द्राक्षांच्या वेलीवर पानेच शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे खरड छाटणी नंतर शेतकर्‍यांनी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. गारपीटीचा मार लागलेल्या काडीमध्ये फलधारणा होत नाही, त्यामुळे घडनिर्मिती होणार नाही. याचा परिणाम ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार्‍या माल छाटणीवर होतो. त्यासाठी शेतकरी हतबल झाले आहेत. कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.