Thu, Jul 18, 2019 20:54होमपेज › Sangli › जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम

जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 11 2018 1:08AMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात आज सकाळी मान्सूनचे आगमन झाले. सर्वत्र दोन तास रिमझिम पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांनी खरीप पेरणीची तयारी सुरू केली आहे. 
मागील आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस बर्‍यापैकी पडला. दोन दिवसांपासून मान्सूनपूरक वातावरण तयार झाले आहे. कोकण व मुंबईत मान्सून धो-धो बरसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही चांगला पाऊस पडू लागला आहे. सांगली जिल्ह्यात आज सकाळी मान्सूनचे आगमन झाले. सांगली व मिरज शहरांत सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेला पाऊस 10.30 वाजेपर्यंत पडत होता. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांत तासभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तासगाव, मिरज तालुक्यांत वरुणराजाने हजेरी लावली.

कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांत अधूनमधून रिमझिम सुरू होती. कवठेमहांकाळ, जत तालुक्यांत  दिवसभर सोसाट्याचा वारा व पावसाची रिपरिप सुरू होती.  दुपारी बारानंतर मात्र वातावरण ढगाळ झाले. ते सायंकाळपर्यंत कायम होते. तापमान कमी झाले आहे. दिवसभर कमाल तापमान 30 व किमान 22 सेल्सिअस अंश होते. हवेतील आर्द्रता 70 ते 90 टक्के होती. वार्‍याचा वेग पश्‍चिमेकडून पूर्वेकडे प्रतितास 33 ते 35 आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन-तीन दिवस पाऊस चांगला पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्‍त केली आहे. पाऊस वेळेत सुरू झाल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे. ऊस, केळी, सोयाबीनला या पावसाचा फायदा होणार आहे. जमिनीत ओलावा चांगला झाला असल्याने पेरण्यांची तयारी सुरू आहे.